वर्षा राऊत ED प्रकरणात शिवसैनिकांना नोटीस, कलम 149 अंतर्गत जमावबंदीचे आदेश

| Updated on: Jan 04, 2021 | 4:43 PM

वर्षा राऊत या ईडी कार्यालयात उपस्थित झाल्यानंतर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात ग्रँड हॉटेलच्या बाहेर पेढे कार्यालयाच्या बाहेर उपस्थित झाले आहेत.

वर्षा राऊत ED प्रकरणात शिवसैनिकांना नोटीस, कलम 149 अंतर्गत जमावबंदीचे आदेश
Follow us on

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी ईडी कार्यलयाच्या परिसरात जमू नये म्हणून कलम 149 अंतर्गत शिवसैनिकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. वर्षा राऊत या ईडी कार्यालयात उपस्थित झाल्यानंतर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात ग्रँड हॉटेलच्या बाहेर पेढे कार्यालयाच्या बाहेर उपस्थित झाले आहेत. त्यामुळे काही गैर होऊ नये यासाठी पोलिसांनकडून शिवसैनिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. (varsha raut ed case Notices to ShivSainiks under Section 149 to prevent them from gathering at ED office )

मिळालेल्या माहितीनुसार, याच शिवसैनिकांनी ईडी कार्यालय बीजेपी कार्यालय म्हणून बॅनर लावला होता. त्यामुळे या शिवसैनिकांना जमावबंदीचा आदेशाच्या नोटिसा पोलिसांनी जारी केल्या आहेत. पण तरीदेखील पोलिसांच्या आदेशाला न जुमानता शिवसैनिक ईडी कार्यालय इथं जमले आहेत.

खरंतर, ईडीकडून वर्षा राऊत यांना 5 जानेवारीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, वर्षा राऊत एक दिवस अगोदर ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. वर्षा राऊत यांना पीएमसी बँक प्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. त्यावर आज त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

वर्षा राऊत यांना ED नोटीस

पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर वर्षा राऊत यांनी 5 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. वर्षा राऊत यांना PMC बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास सांगितलं आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली.

काय आहे PMC बँक घोटाळा?

पीएमसी बँक खोटे खाते दाखवत एका रियल इस्टेट डेव्हलपरला जवळपास 6500 कोटी रुपये कर्ज देत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेला 2019 मध्ये मिळाली होती. हा व्यवहार होऊ नये आणि पैसे वाचावे या हेतूने रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर 24 सप्टेंबर 2019 रोजी निर्बंध लादले. हे निर्बंध 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीचा तपास सुरु आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल (HDIL) आणि वाधवान यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जाते. (varsha raut ed case Notices to ShivSainiks under Section 149 to prevent them from gathering at ED office )

संबंधित बातम्या – 

संजय राऊतांच्या पत्नीला PMC बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीचे समन्स का? नेमकं प्रकरण काय?

पत्नीला ईडीची नोटीस, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

 

(varsha raut ed case Notices to ShivSainiks under Section 149 to prevent them from gathering at ED office )