Varsha Raut | वर्षा राऊत तीन तासांहून अधिक वेळ ED कार्यालयातच

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. ( Varsha Raut ED)

Varsha Raut | वर्षा राऊत तीन तासांहून अधिक वेळ ED कार्यालयातच
Yuvraj Jadhav

|

Jan 04, 2021 | 6:16 PM

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत.  तीन तासांहून अधिक वेळ झाला तरी वर्षा राऊत ईडी कार्यालयात आहेत. वर्षा राऊत यांना ईडीकडून 5 जानेवारीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, वर्षा राऊत एक दिवस अगोदर ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. वर्षा राऊत यांना पीएमसी बँक प्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. (Sanjay Raut wife Varsha Raut Appear before ED)

वर्षा राऊत यांना ED नोटीस

पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर वर्षा राऊत यांनी 5 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. वर्षा राऊत यांना PMC बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास सांगितलं आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली.

काय आहे PMC बँक घोटाळा?

पीएमसी बँक खोटे खाते दाखवत एका रियल इस्टेट डेव्हलपरला जवळपास 6500 कोटी रुपये कर्ज देत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेला 2019 मध्ये मिळाली होती. हा व्यवहार होऊ नये आणि पैसे वाचावे या हेतूने रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर 24 सप्टेंबर 2019 रोजी निर्बंध लादले. हे निर्बंध 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीचा तपास सुरु आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल (HDIL) आणि वाधवान यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जाते.

पीएमसी बँक प्रकरणी ठाकरे सरकारचा निर्णय

ठाकरे सरकारने सप्टेंबर महिन्यात पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला होता. या घोटाळ्यातील रक्कम वसुलीसाठी राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि एचडीआयएलची मालमत्ता विकून वसुली करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. या मालमत्तेचा लिलाव करुन पैसे वसूल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली होती.

संबंधित बातम्या:

संजय राऊतांच्या पत्नीला PMC बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीचे समन्स का? नेमकं प्रकरण काय?

पत्नीला ईडीची नोटीस, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

(Sanjay Raut wife Varsha Raut Appear before ED)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें