“…म्हणून भाजपने हे ‘हौशे, नवशे गवसे’सोबत घेतलेले आहेत”, ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका

चेतन पाटील, Tv9 मराठी

Updated on: Nov 27, 2022 | 11:26 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

...म्हणून भाजपने हे 'हौशे, नवशे गवसे'सोबत घेतलेले आहेत, ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेस्को सेंटर येथे गटप्रमुखांच्या घेतलेल्या मेळाव्यात भाषण करताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांची नक्कल देखील केली. राज ठाकरे यांच्या या टीकेला आता ठाकरे गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केलीय. “शिवसेनेचा मुकाबला एकटा करू शकत नाही म्हणून भाजपने हे हौशे, नवशे गवसे घेतलेले आहेत”, अशी खोचक टीका विनायक राऊत यांनी केली.

“शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये एवढी पडझड होऊन सुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या ताकदीने उभे राहिले आहेत ते पाहून त्यांच्याबद्दल द्वेष आणि तनुक्षित मन लक्षात ठेवून आजचं राज ठाकरे यांचं आजचं भाषण आहे”, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

“शिवसेनेला टार्गेट करणे, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाची ताटं उचलण्याचं काम करणं, यापलीकडे राज ठाकरेंच्या भाषणामध्ये कोणताही नवीन मुद्दा नव्हता”, असा दावा विनायक राऊत यांनी केला.

“राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची नक्कल ही करमणूक म्हणून लोकांनी पाहिली आहे. पण जनता त्यांना कधीच स्वीकारणार नाही”, असं विनायक राऊत म्हणाले.

“उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलत असताना त्यांची जीभ तुरुतुरु चालत होती. शिवसैनिकांनी ते मनावर नक्कीच घेतलेलं आहे”, असंदेखील ते म्हणाले.

“त्यांनी असे किती भोंगे उतरवले आहेत? भोंग्याचा प्रश्न असेल, खळखट्याक, मराठी पाट्यांचा विषय असेल किंवा टोल मुद्दा असेल, ही सगळी फक्त आंदोलन करायची, सेटिंग करायचे आणि त्याच्यातून मग पळकुटेपणा काढायचं धोरण राज ठाकरे यांचं आहे. त्यांच्या मनसेचं असं कर्तृत्व आहे”, असा घणाघात विनायक राऊतांनी केला.

“महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना जिंकून येईल म्हणून आमचं राज ठाकरे सहित भाजप शिंदे सरकार सर्वांना आवाहन आहे, हिंमत असेल या महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लावा”, असं आव्हान विनायक राऊत यांनी दिलं.

“राज ठाकरेंची तोफ छत्रपतींचे अवमान करणाऱ्या राज्यपालांच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणात उठेल. परंतु खूपच पुचाट धोरण राज ठाकरे यांनी राज्यपालांच्या विरोधात स्वीकारलं”, असं ते म्हणाले.

“उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष हा आता विजयाकडे झेपत आहे. त्याला कोण थांबू शकणार नाही”, असा दावा त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

“शेतकऱ्यांची विचारपूस करायला या मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, पण स्वतःचा हात ज्योतिषाकडे दाखवला आणि कामाख्या देवीकडे जावून होम हवन करायला त्यांना वेळ आहे. शेतकरी मेला तरी चालेल पण माझा हात चांगला राहिला पाहिजे”, अशी टीका त्यांनी केली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI