
Akshay Kumar -CM Devendra Fadnavis : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजसाठी (FICCI) बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुलाखत घेतली. या मुलाखतीत मराठी चित्रपट आणि उद्योगाची चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अक्षय कुमारने विचारलेल्या एक प्रश्नाला उत्तर देताना मराठी चित्रपटांचे कौतुक केलेच. पण अक्षय कुमारने आपल्याला मराठी चित्रपटाविषयी एक चांगला मंत्र दिला आणि आता आपण त्यावर नक्की काम करणार असे आश्वासन दिले. त्याची आता चर्चा होत आहे.
या मुलाखतीदरम्यान बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार याने मराठी चित्रपटाविषयी आणि तरुणाईत मराठी चित्रपट लोकप्रिय करण्याविषयी एक थेट प्रश्न केला. मी मराठी सिनेमाचा फॅन आहे. त्याची स्टोरी वेगळी आहे. झेन जीमध्ये मराठी सिनेमा पॉप्युलर करण्याचा काही प्लान आहे का? असा सवाल त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. त्यावर फडणवीस यांनी अक्षय कुमारला उत्तर दिले.
मराठी थिएटरमुळे चित्रपट दमदार
मराठी फिल्म इतकी ताकदवर का आहे, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. कारण मराठी थिएटरने मराठी फिल्म शक्तीशाली केली. देशातील जे भाषिक थिएटर आहेत. ते कमी होताना दिसत आहे. पण मराठी थिएटर इनोव्हेटिव्ह राहिलं आहे. अभिव्यक्तीचं उदाहरण कायम ठेवलं आहे. मराठी प्रेक्षक व्हायब्रंट आहे. आजही मराठी नाटक हाऊसफुल्ल होतात. काही लोकांनी तर १० हजार नाट्यप्रयोग करण्याचा विक्रम केला आहे. नटरंगसारखा सिनेमा आला. दशावतार सारखा सिनेमा आला. सखाराम बाइंडरचा शो होतो. त्याला झेन जी पसंत करत आहे. हा मराठी ऑडिअन्स आहे, तो सिनेमाला जोडला जात आहे. मराठीत क्रिएटिव्हीटी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
एकेकाळी मराठी सिनेमाला थिएटर मिळायचे नाही. ब्लॉक बस्टर सिनेमा आला तर मराठी सिनेमाचं प्रदर्शन रोखलं जायचं. आज परिस्थिती वेगळी आहे. दोन्ही मराठी सिनेमे रिलीज होतात आणि ब्लॉकबस्टर होतात. हे मोठं काम होत आहे. आम्हीही सरकार म्हणून मराठी सिनेमासृष्टीला मदत करणार आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
अक्षयच्या त्या मंत्रावर काम करणार
मी मराठी सिनेमाचा फॅन आहे. त्याची स्टोरी वेगळी आहे. झेन जीमध्ये मराठी सिनेमा पॉप्युलर करण्याचा काही प्लान आहे का? असा सवाल अक्षय कुमारने केला होता. नवी पिढीला मराठी चित्रपटाशी जोडण्याचा मंत्र आपल्याला अक्षय कुमारने दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही काही स्पेसिफिक एफर्ट घेतला नाही. झेन जीला जोडण्याचा तुम्ही मंत्र दिला. त्यावर मी प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे तरुणाईला मराठी चित्रपटांकडे पुन्हा वळवण्यासाठी राज्य सरकार काय मदत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.