Weekend Lockdown: मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, रस्ते ओस, रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट

| Updated on: Apr 10, 2021 | 8:37 AM

राज्य सरकारने कडक निर्बंध लादूनही मुंबई आणि राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. | Weekend Lockdown

Weekend Lockdown: मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, रस्ते ओस, रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट
वीकेंड लॉकडाऊन
Follow us on

मुंबई: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या वीकेंड लॉकडाऊनची (Lockdown) मुंबईत कठोर अंमलबजावणी होताना दिसत आहे. त्यामुळे कालपर्यंत भरभरून वाहणारे मुंबईतील रस्ते आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरात आज सकाळपासून शुकशुकाट पाहायला मिळत आहे. (Weekend lockdown in Mumbai)

राज्य सरकारने कडक निर्बंध लादूनही मुंबई आणि राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता वीकेंड लॉकडाऊनमध्ये पोलीस जराही ढिल देताना दिसत नाहीत. शुक्रवारी रात्रीपासूनच पोलिसांनी गस्त घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे रस्त्यावर कोणीही कामाशिवाय फिरकताना दिसत नाही. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता खासगी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी दादर, अंधेरी, वांद्रे या नेहमी गजबज असलेल्या परिसरांमधील रस्तेही ओस पडले आहेत.

तर दुसरीकडे रेल्वे स्थानकांच्या परिसरातही फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे लोकल ट्रेनमधील अनावश्यक गर्दी कमी झाली आहे. नागरिकांची गर्दी कमी झाल्यामुळे बेस्टच्या बसेसही रिकाम्या धावत आहेत.

कुर्ला स्थानकाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त

राज्य सरकारने कोरोनाच्या कठोर निर्बंधांची अंमलबजावणी केल्यानंतरही मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकात प्रवाशांकडून नियमांचे उल्लंघन होताना दिसत होते. रेल्वे स्थानकात प्रवाशी एकमेकांना खेटून चालत होते. तसेच लोकल ट्रेनमध्येही प्रचंड गर्दी होताना दिसत होती.
मात्र, आजपासून कुर्ला स्थानकात वीकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे कुर्ला स्थानकाच्या परिसरातील वर्दळ 90 टक्के कमी झाली आहे.

मुंबईतील कोरोना स्थिती?

मुंबईत आज दिवसभरात 9 हजार 200 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 5 हजार 99 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मृतांपैकी 28 जणांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 19 पुरुष तर 16 महिलांचा समावेश आहे.

मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 79 टक्के झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 34 दिवसांवर येऊन ठेपलाय. 2 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान मुंबईतील कोविड वाढीचा दर 2 टक्क्यांवर पोहोचला आहे.

संबंधित बातम्या:

Weekend Lockdown | महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन, वाहतूक व्यवस्थेबाबत काय निर्णय?

Maharashtra Weekend Lockdown | सार्वजनिक आणि खासगी वाहनांसाठी महत्त्वाचे नियम

Maharashtra Weekend Lockdown | वीकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु, काय बंद? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

(Weekend lockdown in Mumbai)