Rajesh Kshirsagar : ‘…म्हणून आम्ही एकनाथ शिंदेंसोबत’; चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर काय म्हणाले शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर?

मंत्रिमंडळ आणि खातेवाटप याविषयी सध्या चर्चा सुरू आहेत. शिवसेनेतून बंड करून शिंदे यांच्यासोबत गेलेल्या अनेकांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. तशी राजेश क्षीरसागर यांनादेखील आहे.

Rajesh Kshirsagar : ...म्हणून आम्ही एकनाथ शिंदेंसोबत; चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर काय म्हणाले शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर?
एकनाथ शिंदेंसह राजेश क्षीरसागर
Image Credit source: Insta
| Edited By: | Updated on: Jul 05, 2022 | 7:08 PM

मुंबई : जी कामे शिवसेनेच्या आमदारांची व्हायची ती झाली नव्हती, म्हणून आम्ही गेलो. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आम्हाला सर्वांना निधी दिला. त्यांनी मदत केली म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे मत शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी व्यक्त केले. राजेश क्षीरसागर हे साध्य एकनाथ शिंदे गटात असून आज त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची भेट देखील घेतली. शिवसेना आणि भाजपा नेत्यांची आत जवळीक वाढत असून कोल्हापूर जिल्ह्यातील सेना-भाजपाचे नवीन समीकरण दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांची भेट झाली. शिंदे गट आणि भाजपा एकत्र आहेत. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) माझे जुने सहकारी आहेत. 2014 ते 19मध्ये काही मतभेद झाले होते. त्यामुळे आज मी मनमोकळे करायला भेटलो, असे वक्तव्य त्यांनी केले.

मंत्रीपदाची अपेक्षा

आताची अडीच वर्षे महत्त्वाची आहेत. त्यामुळे जी व्यक्ती उपयुक्त आहे, त्यांचा नक्की विचार करतील. 2014पासून दरवेळी माझे नाव आणि फोटो मंत्री मंडळात समावेश होईल, असे वाटत होते. मात्र मला कधीच स्थान दिले नाही. यावेळी संधी दिली तर आनंद होईल, असे ते म्हणाले. मंत्रिमंडळ आणि खातेवाटप याविषयी सध्या चर्चा सुरू आहेत. शिवसेनेतून बंड करून शिंदे यांच्यासोबत गेलेल्या अनेकांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. तशी राजेश क्षीरसागर यांनादेखील आहे.

‘सुभाष देसाई पडले तरीही त्यांना मंत्री केले, आता मलाही…’

मंत्रीपदाबाबत ते म्हणाले, की सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहे. उपयुक्त असलेल्या काही जणांना घेतले तर सर्व सुकर होते. 2014ला जेव्हा शिवसेना भाजपा युती तुटली तेव्हा सुभाष देसाई पडले, तेव्हा त्यांना मंत्री केले. आज मला जर कोणती जबाबदारी दिली तर नक्की चांगले काम करता येईल. मी गेल्या 36 वर्षात कधीच इकडे तिकडे गेलो नाही. माझ्यासारख्या अनुभवी असलेल्या नेत्याचा वापर केला, तर नक्की फायदा होईल पण तो निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा आहे, असे मंत्रीपदाबाबत क्षीरसागर म्हणाले.

‘मातोश्री आमचे मंदिर, एकनाथ शिंदे संकट मोचक’

निधीचे आणि मदतीचे कारण देऊन राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र मातोश्री आणि शिवसेनेबद्दलही त्यांनी भावना व्यक्त केल्या. शिवसेना आणि भाजपा वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू. मातोश्री आमचे मंदिर आहे. एकनाथ शिंदे हे संकट मोचक आहेत, असे यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले आहेत.