
मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर सुनावणी सुरू आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून विधानसभा अध्यक्षांसमोर युक्तिवाद केला जात आहे. आपलीच बाजू कशी योग्य आहे यावर दोन्ही गटाकडून भर दिला जात आहे. कायद्याचा किस पाडणारे युक्तिवादही दोन्ही गटाकडून केले जात आहेत.विधीमंडळात आपलाच पक्ष कसा कायदेशीर आहे, यावर दोन्ही गटाकडून भर दिला जात आहे. विधानसभा अध्यक्षांनीही दोन्ही गटाच्या वकिलांना पुरावे आणि कागदपत्रे सादर करण्यास सांगितलं जात आहे. त्यामुळे दोन्ही गटाच्या युक्तिवादाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आजच या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष एकूण 34 याचिकांवर सुनावणी करणार आहे. त्यानंतर शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी होणार आहे. यावेळी ठाकरे गटाने सर्व याचिकांची एकदाच सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याला शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे. वेगवेगळ्या याचिकांची वेगवेगळी सुनावणी घेण्याची मागणी शिंदे गटाने केली आहे. तसेच उत्तर दाखल करण्यासाठी दोन आठवड्याची मुदत देण्याची मागणीही शिंदे गटाने केली आहे. तर प्रकरण लांबवू नका. पुढच्या आठवड्यात अंतिम सुनावणी घ्या, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.
आजच्या सुनावणीत ठाकरे गटाकडून 8 मुद्दे मांडले जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचा गट नेता बेकायदेशीर आहे, गटनेताच बेकायदेशीर असेल तर शिंदे गट कायदेशीर कसा?, प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे विचारात घ्या, त्यावर निर्णय घ्या, पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे, त्यामुळे त्यावर निर्णय घेऊ नका,
अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात जाण्याआधी विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेची नोटीस काढली होती, गटनेता आमचा आहे, व्हीपही आमचा आहे, त्यामुळे विधीमंडळ पक्ष म्हणून आम्हाला विचारात घ्या तसेच व्हिप उल्लंघन केल्याप्रकरणी शिंदे गटाला अपात्र करा, असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून केला जाणार आहे.
यावेळी शिंदे गटाकडूनही महत्त्वाचे युक्तिवाद केला जाणार आहेत. विधीमंडळातील संख्याबळ आमच्याकडे आहे. त्यामुळे विधीमंडळ पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळाली पाहिजे. एकनाथ शिंदे हेच मुख्य नेते आहेत, पक्ष त्यांच्या बाजूने आहे, आधीचे पक्षप्रमुख आमदारांचं ऐकून घेत नव्हते. पक्षाच्या विचारधारेविरोधात सगळं सुरू होतं, आम्ही पक्षविरोधी कारवाई केली नाही. बहुमत आणि एकमतानं मित्र पक्षासोबत गेलो आणि शिंदे हेच आमचे गटनेते आहेत, असा युक्तिवाद शिंदे गटाकडून केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.