Who is Seema Haider : प्रेमिका की गुप्तहेर, नेमकं सत्य काय? टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

पब्जी खेळताना सीमा हैदरची ओळख भारतातल्या सचिन मीनाशी झाली. आपण सचिनच्या प्रेमात पडल्याचा दावा सीमा हैदरनं केलाय. सचिनच्या प्रेमापोटी आपण पाकिस्तानातून भारतात अवैधरित्या प्रवेश केल्याचा दावाही सीमानं केलाय.

Who is Seema Haider : प्रेमिका की गुप्तहेर, नेमकं सत्य काय? टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Seema Haider
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 17, 2023 | 11:25 PM

मुंबई : पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेल्या सीमा हैदरची यूपी एटीएसकडून चौकशी सुरु आहे. पब्जी गेमद्वारे सीमाची ओळख भारतातल्या एका युवकाशी झाली होती. आपण प्रेमासाठी भारतात आल्याचा दावा सीमानं केलाय.पण तपास यंत्रणांना मात्र तिच्यावर संशय बळावलाय.

पाकिस्तानातून भारतात अवैधरित्या आलेल्या सीमा हैदरवर तपास यंत्रणांचा संशय बळावत चाललाय. सीमा हैदर पाकिस्तानची गुप्तहेर असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळं यूपी एटीएसनं सीमा हैदरला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. पब्जी खेळताना सीमा हैदरची ओळख भारतातल्या सचिन मीनाशी झाली. आपण सचिनच्या प्रेमात पडल्याचा दावा सीमा हैदरनं केलाय. सचिनच्या प्रेमापोटी आपण पाकिस्तानातून भारतात अवैधरित्या प्रवेश केल्याचा दावाही सीमानं केलाय.

पाहा व्हिडीओ-:

सीमा हैदर मूळची पाकिस्तानातल्या कराचीची आहे, 2014 मध्ये तिचं लग्न गुलाम हैदर नावाच्या व्यक्तीशी झालं. गुलाम हैदरपासून तिला 4 मुलं आहेत. 2019 मध्ये पब्जी खेळताना तिची ओळख भारतात राहणाऱ्या सचिन मीना या युवकाशी झाली. सीमा 27 वर्षांची आहे. तर सचिन 25 वर्षांचा आहे. सीमा पाकिस्तानातली आपली प्रॉपर्टी विकून पहिल्यांदा दुबईला गेली, दुबईतून ती नेपाळला आली, नेपाळमधून सीमानं बसद्वारे भारतात प्रवेश केला.

सीमाकडे अनेक आधार कार्ड आणि काही पासपोर्ट असल्याचा आरोप करण्यात येतोय. पण हे आरोप सीमानं फेटाळून लावले आहेत. भारतात प्रवेश करण्याआधी सीमाकडे पाकिस्तानी सीमकार्ड होतं. पण भारतात प्रवेश करण्याआधी सीमानं ते तोडून फेकून दिल्याचा आरोप आहे. भारतात प्रवेश केल्यानंतर तीनं वायफायद्वारे सचिनला कॉल केला. सीमा आपण फक्त प्राथमिक शाळेपर्यंतच शिकल्याचं सांगतेय. पण तिच्या बोलण्यात काही इंग्रजी शब्द येत असल्यानं तपास यंत्रणांना तिच्यावर संशय वाटतोय.

सीमाचा पती गुलाम हैदर सौदी अरेबियात नोकरी करतो. सीमानं त्याच्यावर मारहाण केल्याचे आरोप केले आहेत. आपण कधीही पाकिस्तानात परत जाणार नसल्याचा दावाही तिनं केलाय.सीमा हैदरवर भारतात अवैधरित्या प्रवेश केल्याचा गुन्हा आहे. कोर्टानं तिची जामिनावर मुक्तताही केलीय. पण तपास यंत्रणांचा तिच्यावरचा संशय बळावलाय. या प्रकरणात आता यूपी एटीएसची एन्ट्री झालीय. त्यामुळं सीमा हैदर खरंच आपल्या प्रेमापोटी भारतात आली की ती पाकिस्तानची गुप्तहेर आहे हे लवकरच सिद्ध होणार आहे.