मुंबईच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांचीच निवड का? 5 महत्त्वाची कारणं जाणून घ्या

मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या नावाची घोषणा करण्यामागे कोणती ५ कारणे आहेत, याबद्दल जाणून घ्या

मुंबईच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांचीच निवड का? 5 महत्त्वाची कारणं जाणून घ्या
Ritu Tawde mumbai mayor
| Updated on: Feb 07, 2026 | 12:10 PM

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. त्यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरपदाच्या उमेदवाराची अखेर अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. घाटकोपरमधील भाजपच्या अनुभवी आणि आक्रमक नगरसेविका रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदासाठी वर्णी लागली आहे. भाजपने रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी या निर्णयाची घोषणा केली. रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी नियुक्ती झाल्यानंतर भाजपने मुंबईचा महापौर बसवताना अत्यंत सूक्ष्म राजकीय गणिते आखल्याचे बोललं जात आहे.

मुंबई भाजपने रितू तावडे यांना महापौरपदाची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपने एकाच वेळी मराठी अस्मिता आणि सोशल इंजिनिअरिंग असा दुहेरी मास्टरस्ट्रोक खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नगरसेविका रितू तावडे यांची महापौरपदी निवड होण्यामागे खालील ५ महत्त्वाची कारणे सांगितली जात आहेत.

1. मराठी-गुजराती समाजातील दुवा

रितू तावडे या स्वतः मराठा समाजातील असून एक खंबीर मराठी चेहरा म्हणून ओळखल्या जातात. मात्र, त्या घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ मधून निवडून येतात, जो भाग प्रामुख्याने गुजराती बहुल आहे. भाजपसाठी हा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक आहे. यामुळे पक्षाला मराठी मतदारांची सहानुभूती मिळेलच. पण गुजराती मतदारांमध्येही आपला प्रतिनिधी सर्वोच्च पदावर असल्याचा विश्वास निर्माण होईल. हे समीकरण येणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपसाठी फायदेशीर ठरू शकते.

2. शिक्षण समितीमधील प्रभावी कामगिरी

रितू तावडे यांची ही नगरसेवक म्हणून दुसरी टर्म आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद अत्यंत प्रभावीपणे भूषवले आहे. महापालिकेतील गुंतागुंतीचे विषय आणि प्रशासकीय कामकाज हाताळण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर ठेवलेला वचक यामुळे त्या एक अभ्यासू नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात.

3. विरोधकांच्या मराठी महापौर कार्डाला छेद

गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून भाजपचा महापौर अ-मराठी असेल असा प्रचार केला जात होता. मात्र, रितू तावडे या मराठी असल्याने त्यांच्या रूपाने एक खंबीर मराठी चेहरा भाजपने महापौरपदाच्या शर्यतीत उतरवला आहे. त्यामुळे भाजपने विरोधकांच्या राजकारणाला ब्रेक लावला आहे.

4. आक्रमक वक्तृत्व आणि पक्षाशी निष्ठा

५३ वर्षीय रितू तावडे या केवळ अनुभवीच नाहीत, तर त्या आक्रमक वक्त्या म्हणूनही ओळखल्या जातात. सभागृहात विरोधकांच्या टीकेला प्रतिउत्तर देण्यासाठी भाजपला एका कणखर नेतृत्वाची गरज होती, जी तावडे यांच्या रूपाने पूर्ण होईल, असे म्हटले जात आहे.

5. पक्षांतर्गत पकड आणि क्लीन इमेज

नगरसेवक पदाच्या दोन टर्ममध्ये रितू तावडे यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ राहिली आहे. घाटकोपर हा भाजपचा अभेद्य बालेकिल्ला असून तिथे त्यांनी केलेली बांधणी पक्षाला अधिक मजबूत करणारी ठरली आहे. महिला आरक्षण असल्याने पक्षाकडे इतरही नावे होती, परंतु रितू तावडेंचा प्रशासकीय अनुभव सर्वाधिक असल्याने त्यांचे पारडे जड ठरल्याचे बोललं जात आहे.