
पवार कुटुंबीयांची राजकीय पटलावरची वाटचाल वेगवेगळी असली तरी कौटुंबिक आणि नातेसंबंधात त्यांच्यातील जिव्हाळा अनेकदा समोर आला आहे. आज मुंबईत पवार कुटुंबियातील नात्याची घट्ट वीण पुन्हा समोर आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुड्यानंतर आता त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पूत्र युगेंद्र पवार यांचाही साखरपुडा होत आहे. त्यासाठी पवार कुटुंबीय एकत्र आले आहेत.
मुंबईत साखरपुडा
मुंबईतील प्रभादेवी येथील इंडियाबुल्स इमारतीत आज 3 ऑगस्ट रोजी युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा होत आहे. या सोहळ्यासाठी पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आले आहे. युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी अजितदादांविरोधात शड्डू ठोकले होते. या निवडणुकीत अर्थातच अजितदादांचा अनुभव कामी आला. पण कौटुंबिक आणि राजकीय हितसंबंध एकत्र करण्याची गल्लत पवार कुटुंबीय करत नाही ही कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल. आज मुंबईत होणाऱ्या साखरपुड्यानिमित्ताने सर्व पवार कुटुंबीय एकत्र येत आहेत.
तरुण पिढीचे शुभमंगल
पवार कुटुंबातील तरुण पिढी आता राजकारण, समाजकारण, व्यवसायात सक्रीय होत आहे. पवार कुटुंबीयातील अनेक जण विविध क्षेत्रात त्यांचे कौशल्य दाखवत आहेत. या पिढीचे चार हात करण्याचे योग जुळून येत आहे. या तरुण पिढीचे शुभमंगल आता होत आहे. अजित दादांचे चिरंजीव जय पवार यांचा नुकताच साखरपुडा झाला आहे. तर युवा नेते युगेंद्र पवार आणि तनिष्का संजीव कुलकर्णी यांचाही साखरपुडा आज होत आहे. लवकरच पवार कुटुंबात दोन नवीन सुना येणार आहेत. या मंगलसोहळ्यानिमित्ताने या कुटुंबातील तीनही पिढ्या एकत्र आल्याचे दिसते. वडिलधारी मंडळींच्या आशीर्वाद घेत हे नव दाम्पत्य लवकरच गृहस्थाश्रमात प्रवेश करतील.
यापूर्वी जय आणि ऋतुजा यांनी शरद पवार यांना भेटून आशीर्वाद घेतले होते. यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. या कॅमेऱ्याबद्ध आठवणी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल अकाऊंटवरून शेअर केल्या होत्या.