
Bhiwandi Clash : भिवंडीतील प्रतिष्ठेच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये कोणार्क विकास आघाडीचे विलास आर पाटील यांचा मुलगा मयुरेश पाटील यांनी भाजपा आमदार महेश चौघुले यांचा मुलगा मित चौघुले यांचा पराभव केला आहे. या जय-पराजयानंतर मागील दोन दिवसांपासून या परिसरात वातावरण तणावाचे आहे. असे असतानाच आता मित चौघुले यांचे समर्थकांनी कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या घरावर प्राणघातक हल्ला करीत दगडफेक केली. यावेळी काही कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला केला गेला. त्यानंतर विलास पाटील समर्थक छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर बसून आंदोलन करीत होते. त्याच वेळी समोर असलेल्या आमदार महेश चौघुले यांच्या कार्यालयात मोठा जमाव जमला. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळीच आमदार महेश चौघुले यांच्या कार्यालयातून दगडफेक सोडा वॉटर बॉटल यांचा मारा करण्यात आला. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियमंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करीत दोन्ही बाजूकडील जमाव पांगवला. यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी परिसरात तैनात करण्यात आला. दरम्यान या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून दगडफेकीमध्ये माजी महापौर प्रतिभा पाटील यासुद्धा जखमी झाल्या आहेत.
महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर रात्री नऊ वाजताच्या सुमारास कोणार्क विकास आघाडीचे विजयी उमेदवार माजी महापौर विलास पाटील मतदारांचे आभार मानण्यासाठी प्रभागात फिरत असताना त्यांच्या बंगल्यावर आमदार पुत्र मित चौघुले व त्याच्या समर्थकांनी दगडफेक करीत हल्ला चढवला. या घटनेनंतर विलास पाटील समर्थक छत्रपती शिवाजी महाराज चौकात कारवाईची मागणी करीत रस्त्यावर ठिय्या देऊन आंदोलन केले. परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी या भागात बंदोबस्त वाढवला होता. या चवेळी जोरदार घोषणाबाजी करीत दोन्ही गट एकमेकांना भिडले .या वेळी आमदार महेश चौघुले यांच्या कार्यालयातील समर्थकांनी दगडफेक व काचेच्या बाटल्या यांचा मारा केला. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार करीत दोन्ही गटाना पांगवले.
दरम्यान, विलास पाटील यांनी आमदार महेश चौघुले व सार्थकांनी हल्ला केला असल्याचा आरोप केला. पोलिस प्रशासन त्यांच्या बाजूने उभे राहिले असल्याचे म्हणत विलास पाटील यांनी पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून कारवाईची मागणी केली आहे. निजामपूर पोलिसांनी सुरवातीपासून भाजपाच्या बाजूने काम करीत आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला, त्याचा निषेध आहे, असे विलास पाटील म्हणाले आहेत. दुसरीकडे आमदार महेश चौघुले यांनी आरोप फेटाळत विलास पाटील समर्थक आमच्या कार्यालयात मारहाण करण्यास घुसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.