नगर परिषदेत भाजपचा दणदणीत विजय, निवडणूक नेमकी कुठे फिरली? फडणवीसांनी एका वाक्यात सांगितलं

राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे, दरम्यान त्यानंतर आता या निकालावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नगर परिषदेत भाजपचा दणदणीत विजय, निवडणूक नेमकी कुठे फिरली? फडणवीसांनी एका वाक्यात सांगितलं
देवेंद्र फडणवीस
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 21, 2025 | 6:17 PM

आज नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे, भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.  राज्यात भाजपचे नगराध्यक्षपदाचे 118 उमेदवार विजयी झाले आहेत. तर महायुतीचे 213 नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकाला आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. दरम्यान त्यानंतर आता  या निवडणूक निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे, त्यांनी महायुतीच्या विजयाचं कारण  सांगितलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

मंत्री आणि कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली. पक्ष आणि संघटनेत चांगला संवाद निर्माण झाला. त्यामुळे अभूतपूर्व विजय मिळाला आहे. २०१७ पेक्षाही मोठा विजय मिळाला आहे. गेल्या २० -२५ वर्षाच्या राज्याच्या इतिहासात इतका मोठा विजय कुणाला मिळाला नसेल. एवढा मोठा विजय आम्हाला मिळाला. मी नागरिकांचे आभार मानतो. या निवडणुकीत मी सकारात्मक प्रचार केला. व्यक्ती, नेता किंवा पक्षाच्या विरोधात बोललो नाही. आम्ही विकासावर मते मागितली. काय केलं ते सांगितलं आणि काय करणार याची ब्लूप्रिंट मांडली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. ही भारताच्या इतिहासातील पहिली निवडणूक असेल की  कुणावरही न टीका करता लढवली गेली आणि आम्हाला यामध्ये मोठं यश मिळालं असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आज देशात मोदींच्या नेतृत्वात भाजप आणि एनडीएबद्दल सकारात्मकता आहे. त्याचा फायदा झाला आहे. आमचे वरिष्ठ नेते आहेत, अमित शाह, नड्डा, नितीन नवीन असतील संपूर्ण केंद्रीय नेतृत्वाने आमच्यावर विश्वास दाखवून आमच्यावर सर्व जबाबदारी सोपावली त्यामुळे आम्हाला मोठं यश मिळालं आहे. आमच्या नेत्यांनी त्या त्या विभागात चांगलं कोऑर्डिनेशन केलं. पंकजा ताई, अतुल सावे, संभाजीराव निलंगेकर या सर्वांनी चांगलं कोऑर्डिनेशन केलं. उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन, जयकुमार रावल यांनी चांगलं काम केलं. यांच्यासोबत अनेक लोकांनी चांगल्या पद्धतीने काम केलं. विदर्भात बावनकुळे लक्ष देऊन होते. कोकणात रवींद्र चव्हाण यांनी लक्ष घातलं. सर्व नेत्यांनी या निवडणुकीत चांगलं काम केलं, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.