दोन मित्र, 40 लाखांची खंडणी, पण अचानक शुद्धीवर असलेल्या मुलाने झोप उडवली अन् मग… नागपुरातील हत्याकांडाचा कसा लागला छडा?
नागपूरमधील अथर्व ननोरे हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे. ४० लाखांच्या खंडणीसाठी शेजाऱ्यानेच हा कट रचल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींना कशी अटक केली आणि त्या दिवशी काय घडलं? वाचा सविस्तर बातमी.

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरला हादरवून सोडणाऱ्या अथर्व ननोरे अपहरण आणि हत्या प्रकरणाची एक मोठी अपडेट समोर आली आहे. अथर्व ननोरे या मुलाच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. केवळ पैशांच्या हव्यासापोटी एका ओळखीच्या शेजाऱ्यानेच दोन मित्रांच्या मदतीने १४ वर्षांच्या निष्पाप मुलाचा बळी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गिट्टीखदान पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना आज पहाटे अटक केली आहे. या घटमुळे परिसरात दहशतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
गुरुवारी नागपूरच्या गिट्टीखदान परिसरात हनुमान जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. अथर्व ननोरे हा या शोभायात्रेत स्वयंसेवक म्हणून उत्साहाने सहभागी झाला होता. मात्र, या शोभायात्रेच्या गर्दीचा फायदा घेऊन आरोपींनी त्याचे अपहरण केले. रात्री उशिरापर्यंत मुलगा घरी न परतल्याने पालक चिंतेत होते. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारावर अथर्वच्या घराशेजारी राहणारा जयराम गोपाल यादव याची कसून चौकशी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले. जयराम हा ननोरे कुटुंबाच्या चांगल्या ओळखीचा होता. त्याला अथर्वच्या वडिलांच्या आर्थिक व्यवहारांची आणि प्रॉपर्टीची कल्पना होती. त्यांच्याकडून ४० ते ५० लाख रुपयांची मोठी खंडणी वसूल करण्याच्या हेतूने त्याने केतन उर्फ कुणाल रमेश शाहू आणि आयुष मोहन शाहू या दोन मित्रांना सोबत घेऊन हा कट रचला.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सुरुवातीला अथर्वचे अपहरण केले. त्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवले होते. ते त्याला बेशुद्ध करून खंडणीसाठी फोन करणार होते. मात्र, अथर्व काही केल्या बेशुद्ध होत नव्हता. त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत होते. अथर्व शुद्धीवर असल्याने तो जोरजोरात ओरडेल आणि लोकांना गोळा करेल किंवा आपल्याला ओळखेल, या भीतीपोटी आरोपी घाबरले. याच धास्तीतून त्यांनी अथर्वला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. याच मारहाणीत अथर्वच्या डोक्यावर वर्मी घाव बसला. तसेच गळा आवळल्याने अथर्वचा जागीच मृत्यू झाला.
अधिक तपास सुरु
अर्थवची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्याचा मृतदेह एका पोत्यात भरला. त्याचे हात-पाय बांधून शनिवारी दुपारी भरतवाडा परिसरातील पुलाखाली फेकून दिला. मृतदेहाजवळ अथर्वचे शोभायात्रेतील ओळखपत्र सापडल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांना सोपे झाले. गिट्टीखदान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पहाटे तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. यामागे आणखी कोणाचा हात आहे का, याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.