गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कट्टर विरोधक असणाऱ्या भाजप आणि काँग्रेसने केली युती, राष्ट्रवादीचा पराभव; थेट मुंबईपर्यंत चर्चा

नागपूर जिल्ह्यातील मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या कट्टर विरोधकांनी युती करून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चा पराभव केला आहे. या अप्रत्याशित युतीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कट्टर विरोधक असणाऱ्या भाजप आणि काँग्रेसने केली युती, राष्ट्रवादीचा पराभव; थेट मुंबईपर्यंत चर्चा
| Updated on: Jun 03, 2025 | 4:06 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये युती झाली आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कट्टर विरोधक आहेत. पण भाजपचे माजी आमदार टेकचंद सावरकर आणि काँग्रेस नेते सुनील केदार गटाने युती केली. या युतीमुळे राष्ट्रवादी अजित दादा गटाचा पराभव झाला आहे. त्यामुळे अजित दादा गटाचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी थेट अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे.

नागपूर जिल्ह्यातील मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत कट्टर विरोधक भाजप आणि काँग्रेसच्या युतीचा विजय झाल्यानंतर सर्वत्र जल्लोष पाहायला मिळत आहे. रामटेकचे काँग्रेस खासदार शामकुमार बर्वे आणि भाजपचे माजी आमदार टेकचंद सावरकर एकत्र तक्रार स्वीकारतात. मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत काँग्रेस-भाजप युतीचे पॅनेल निवडून आले. यामुळे एकाकी पडलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर याच्या पॅनेलचा पराभव झाला.

थेट अजित पवारांकडे तक्रार

मौदा खरेदी विक्री संघात काँग्रेसचे नेते सुनील केदार आणि भाजपचे माजी आमदार टेकचंद सावकर यांच्या पॅनेलचे सर्व 13 उमेदवार निवडून आले. “माजी आमदार टेकचंद सावरकर आणि सुनील केदार, भ्रष्ट युती केली आम्हाला धोका दिला” असा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष बाबा गुजर यांनी केला आहे. त्यांनी थेट अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे.

मौद्यापासून ते मुंबईपर्यंत चर्चा

नागपूर जिल्ह्यात काँग्रेस नेते सुनील केदार आणि भाजपचे कट्टर वैर आहे. लोकसभेच्या निवडणुकीत केदारांनी भाजपचा पराभव केला. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत मात्र भाजपने केदारांना मोठा पराभवाचा धक्का दिला. त्यांच्यासह केदारांच्या सर्व समर्थकांना पराभूत केलं. आता भाजपच्याच एका नेत्याने त्यांच्यासोबत युती केल्याने अनेकांना धक्का बसला. त्यामुळे भाजप काँग्रेस युतीची मौद्यापासून ते थेट मुंबई पर्यंत चर्चा आहे.