माझे फोटो वापरू नका, शरद पवार यांची सक्त ताकीद, अजितदादा गटाची पहिली प्रतिक्रिया; बड्या मंत्र्याचं मोठं विधान

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार हे आमचे गुरू असल्याचं स्पष्ट केलं. पवार आमचे गुरू असल्याने आम्ही त्यांचे फोटो वापरणारच, असंही आत्राम यांनी स्पष्ट केलं आहे.

माझे फोटो वापरू नका, शरद पवार यांची सक्त ताकीद, अजितदादा गटाची पहिली प्रतिक्रिया; बड्या मंत्र्याचं मोठं विधान
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 17, 2023 | 8:51 AM

नागपूर | 17 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे फोटो सर्रासपणे वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शरद पवार चांगलेच संतापले आहेत. फोटो वापरणाऱ्यांना शरद पवार यांनी चांगलीच ताकीद दिली आहे. माझे फोटो वापरू नका. नाही तर कोर्टात जाईन, असा इशाराच शरद पवार यांनी दिला आहे. त्यामुळे अजित पवार गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. शरद पवार यांनी तंबी दिल्यानंतर अजित पवार गट काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अपेक्षेनुसार अजितदादा गटाने प्रतिक्रियाही दिली आहे. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी या मुद्द्यावर अजितदादा गटाची भूमिका स्पष्ट केली आहे.

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवार यांच्या फोटोबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर, शरद पवार हे आमचे गुरू आहेत. गुरुचे फोटो छापणारच. कायदेशीर कारवाई करतील तेव्हा बघू कोर्टाकडून काय निर्देश येतात ते. पण ते आमचे गुरू आहेत. त्यांचा फोटो लावणारच, असं धर्मरावबाबा आत्राम यांनी ठणकावून सांगितलं. शरद पवार यांचे आशीर्वाद राहिले पाहिजे. सध्या त्यांचे आशीर्वाद आहेत. ते एनडीएत येणार की नाही सांगू शकत नाही. त्याबाबत नेते निर्णय घेतील, असं आत्राम यांनी सांगितलं.

मलिक आमच्यासोबतच येणार

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक कुणाच्या बाजूने जाणार? याबाबत त्यांना विचारण्यात आले. नवाब मलिक आमचे सहकारी आहेत. ते दादांचं नेतृत्व मान्य करतील, असा दावा आत्राम यांनी व्यक्त केला. त्यामुळे नवाब मलिक हे अजितदादा गटात जाणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे.

लोकसभा लढणारच

आत्राम यांनी यावेळी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं. सहा ते आठ महिने वेळ आहे. लोकसभा निवडणूक लढायचीच आहे. एनडीएकडून मी लोकसभा निवडणूक लढणार आहे. यात काही शंकाच नाही, असं आत्राम म्हणाले.

आम्ही एनडीएसोबतच

काँग्रेसच्या ए आणि बी प्लान विषयी त्यांना विचारण्यात आले. त्यावर या प्लानची मला माहिती नाही. काँग्रेसचे कोणतेही प्लान असोत. आम्ही एनडीएसोबत आहोत. एनडीएसोबतच राहणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं.