
Winter Session 2025: सध्या राज्यात बिबट्यांनी तुफान धुमाकूळ घातला आहे. बिबट्यांचे मानवी वस्तीवरील हल्ले वाढले आहे. यामध्ये काही लहान मुलांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण दिवसागणिक जखमी होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः जुन्नर तालुका, अहिल्यानगर, सोलापूर, नाशिक, धुळे, मुंबई नजकीचा भाग, मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर परिसरात बिबट्या, वाघाची दहशत पसरली आहे. बिबट्याचे हल्ले वाढलेले असतानाही रोजच्या कारवाई व्यतिरिक्त ढोस उपाय योजना होत नसल्याने जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे बिबट्याचा वेष परिधान करूनच विधानसभेत दाखल झाले. त्यांनी हिवाळी अधिवेशनात या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले. त्यांच्या या पेहरावांची आणि तितकीच त्यांच्या मुद्दाची नागपूरमध्ये तुफान चर्चा सुरू आहे.
राज्यात 9-10 हजार बिबटे
नागपूरच्या वेशीवर बिबट्या आला आहे. नागपूरच्या सीमेवरील भागात बिबटे आले आहेत. राज्यात 9-10 हजार बिबट्यांची संख्या आहे असे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले. जुन्नर तालुक्यात 55 लोकं गेल्या तीन महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यात मेल्याचा दावा सोनवणे यांनी केला. बिबट्यांना पकडायचं सोडून सरकार महिलांना, शेतकऱ्यांना, मुलाबाळांना काटरे लोखंडी पट्टा मानेला लावण्याचा सल्ला देत आहे. आमची मुलं अंगणात नाही. रस्त्यावर दिसत नाही. शाळेमध्ये जात नाही. घराभोवती तारेचं कुंपण करुन त्यात करंट सोडून आम्हाला आता बसण्याची वेळ आली आहे. मला असं वाटतं की असं अनेक उपाय करण्यात काय हाशील. त्यावर तोडगा काढा अशी मागणी आमदार महोदयांनी केली.
रेस्क्यू ऑपेरशन राबवा
यावेळी शरद सोनवणे यांनी राज्यात रेस्क्यू ऑपरेशन राबविण्याची विनंती केली. राज्यात दोन हजार बिबटे राहतील असं रेस्क्यू सेंटर येत्या तीन महिन्यात तयार करा. एक हजार मादी बिबट्या, नर बिबट्या वेगळे करा. त्यामुळे नसबंदीचा विषय मिटेल. हे हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी सरकारने दोन रेस्क्यू सेंटर तातडीने जुन्नर तालुक्यात सुरू करावेत. एक अहिल्यानगरमध्ये करावे. आपल्याला बिबट्यासाठी मायक्रो ऑपरेशन करावं लागेल.
राज्य आपत्ती घोषीत करा
शेळ्या सोडून काही होणार नाही. कारण शेळ्या जंगलात जातील. पण बिबटे तर आता ऊसात आणि आमच्या घराजवळ आले आहेत. त्यामुळे जे सचिव मुंबईत एसी रुममध्ये संरक्षणतात राहतात. त्यांना ग्रामीण भागातील परिस्थिती माहिती नाही. त्यांना जनतेच्या अडचणी माहिती नाही. तीन, सहा महिन्यांच्या बाळांची काळजी घेण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिबटे आता रात्रीच नाही तर दिवसा सुद्धा महिला-पुरूषांवर हल्ले करत आहेत. त्यामुळे बिबट्यांचे हल्ले हे राज्य आपत्ती घोषीत करा अशी मोठी आणि महत्त्वाची मागणी शरद सोनवणे यांनी केली. तातडीने मुख्यमंत्र्यांनी याविषयीची घोषणा करावी. यापुढे एकही शेतकऱ्याचा, त्यांच्या मुलाबाळांचा बळी आम्हाला मान्य नाही, असा कडक इशाराही शरद सोनवणे यांनी दिला.
आम्ही जंगलात जात नाही. जंगलात आमचं अतिक्रमण नाही. पण जंगलातील प्राणी मनुष्य वस्तीत आला आहे. त्याने गुन्हा केल आहे. बिबट्या हा शेड्यूल्ड एकचा प्राणी नाही. तो शेड्यूल्ड दोनचा प्राणी आहे. त्यामुळे त्याला त्यातच टाका. मयताच्या कुटुंबाला 25 लाख रुपये मदत देण्यापेक्षा व्यक्ती वाचवा. जागा मुबलक आहे. त्यामुळे येत्या 90 दिवसात रेस्क्यू सेंटर तयार करा आणि पुढे एकही बिबट्या मुक्त फिरणार नाही अशी व्यवस्था करा अशी मागणी सोनवणे यांनी केली.