फडणवीसांच्या घराकडे पाणी घेऊन निघाले, आमदार नितीन देशमुखांना पोलिसांनी परवानगी नाकारली, काय घडलं?

| Updated on: Apr 19, 2023 | 7:02 PM

फडणवीस-शिंदे सरकारकडे अकोला-अमरावती भागातील पाणी प्रश्न घेऊन निघालेले आमदार पुढे काय भूमिका घेणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

फडणवीसांच्या घराकडे पाणी घेऊन निघाले, आमदार नितीन देशमुखांना पोलिसांनी परवानगी नाकारली, काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर : अकोला (Akola) अमरावती येथील खारपट्ट्यातील पाणी प्रश्न घेऊन निघालेले आमदार नितीन देशमुख यांच्या आंदोलनात बाधा येते की काय अशी स्थिती आहे. या भागातील 69 गावांतील लोक जे पाणी पितात, तेच पाणी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना देऊ, त्यांना त्याच पाण्याने अंघोळ करायला लावू, त्यानंतरच त्यांना आमच्या वेदना कळतील, असा पवित्रा येथील नागरिकांनी घेतला आहे. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात अकोला , अमरावती ते नागपूर अशी पदयात्रा येथील ग्रामस्थांनी काढली आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची ही पदयात्रा सुरु होऊन दहा दिवस उलटले. २१ तारखेला त्यांना नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या घरी धडक द्यायची होती, मात्र नागपूर पोलिसांनी या भेटीला परवानगी नाकारली आहे.

ठाकरे गटाचे आमदार, गुन्हे दाखल

अकोला जिल्ह्यातून ही पदयात्रा १० एप्रिल रोजी निघाली. पुढे अमरावती ते नागपूर असा प्रवास करत ६९ गावांतील पाण्याचे नमूने एका टँकरमध्ये भरले गेले. हे पाणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्यायला देणार, अशी भूमिका नितीन देशमुख यांनी घेतली. मात्र या पदयात्रेला परवानगी नसल्याने अकोल्यातच नितीन देशमुख आणि त्यांच्या १०० ते १२५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. तरीही ही पदयात्रा पुढे निघाली. आज ही पदयात्रा नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथे पोहोचली आहे. मात्र नागपूर येथे देवेंद्र फडणवीसांच्या घरी ४०० ते ५०० कार्यकर्ते घेऊन जाण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. त्यामुळे आमदार नितीन देशमुख पुढे काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..

चर्चेतले आमदार

हे तेच आमदार आहेत, जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतला गेलेल्या आमदारांच्या ताफ्यातून माघारी फिरले. उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले. नंतर आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अकोल्यात त्यांचा मोठा सत्कारही करण्यात आला. आमदार नितीन देशमुख यांना भर सभेत आदित्य ठाकरेंनी मिठी मारली. तर नितीन देशमुख यांनी यावेळी आदित्य ठाकरेंना चरणस्पर्श करण्याचा प्रयत्न केला, यावरूनही मोठी चर्चा रंगली होती. आता फडणवीस-शिंदे सरकारकडे अकोला-अमरावती भागातील पाणी प्रश्न घेऊन निघालेले आमदार पुढे काय भूमिका घेणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.