टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम… विश्वास नांगरे पाटलांचं विधान चर्चेत
नागपुरात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला, तसेच ४५ गुन्हे असलेला ड्रग सिंडिकेट प्रमुख विशाल गुप्ताला अटक झाली. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केलेल्या 'करेक्ट कार्यक्रम' या विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे. नागपूर पोलिसांनी गेल्या महिन्यात चार ड्रग्स गँगवर मोक्का लावला असून, नशामुक्त नागपूरच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.

नागपूरमध्ये एका घरात नकली नोटा छापल्या जात असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे घरमालकानेच पोलिसांना ही खबर दिली. घर मालकाने नोट छापण्यासाठी लागणारे कागद पाहिले होते. त्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क करून माहिती दिली. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं असता, पोलीस टप्प्यात आल्यावरच करेक्ट कार्यक्रम करतात, असं सूचक विधान विश्वास नांगरे पाटील यांनी केलं. त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
नागपूरच्या ड्रग सिंडिकेटमधील मुख्य नाव असलेला आणि नावावर 45 गुन्हे दाखल असलेला विशाल उर्फ फल्ली गुप्ता याला अटक करण्यात नागपूर पोलिसांनी अखेर यश मिळाले आहे. त्याविषयी नागपूर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. नागपूर पोलिसांद्वारे गेल्या चार आठवड्यांत चार गँगवर एनडीपीएस अंतर्गत मोक्का लावण्यात आला आहे. त्यावर नशामुक्त नागपूरच्या दिशेने हे मोठे पाऊल असल्याचं विश्वास नांगरे पाटील म्हणाले.
करेक्ट कार्यक्रम होणारच
नागपूर ग्रामीण महसूल खापरखेडा येथील एका प्रकरणातील तपासावर विचारले असताना, पोलिस आयुक्तांनी मासलेवाईक शेरा मारला. आरोपी करेक्ट टप्प्यात येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. तो करेक्ट टप्प्यात आला तर करेक्ट कार्यक्रम करणार, असं खुमासदार उत्तर विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.
म्हणून नकली नोटांची छपाई
बनावट नोटा प्रकरणात एटीएस कारवाई करत आहे. आरोपी घरात प्रिंटर आणून नोटा प्रिंट करायचे. मात्र, त्यांच्याकडच्या नोटांची गुणवत्ता नव्हती. शेअर मार्केटमध्ये त्यांचं खूप मोठं नुकसान झालं. म्हणून हे लोक नकली नोटा छापण्याकडे वळले, असं नांगरे पाटील म्हणाले.
महत्त्वाची कामगिरी
या महिन्यात 4 ड्रग्स गँगवर एनडीपीएस कायद्यांतर्गत नागपूर पोलिसांकडून मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीत 87 लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या. एटीएस आणि पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली होती. यावेळी आरोपीला अटक करण्यात आली होती.
नागपुरातील ढोमणे ज्वेलर्स चोरी संदर्भात आरोपीला अंदमान निकोबार येथून अटक करण्यात आली आहे.
दसऱ्याच्या दिवशी उत्तरप्रदेशातील शिवा शर्मा मर्डर केसप्रकरणी श्रद्धा दुबेसहीत दोघांना अटक करण्यात आली.
सणासुदीच्या काळात वाहतुकीवर पोलिसांचं अधिक लक्ष राहणार
