पालकमंत्र्यांचा नागपूर लॉकडाऊनचा इशारा, व्यापारी संतापले, म्हणाले, ‘जरा थांबा, आत्मघातकी निर्णय घेऊ नका’

| Updated on: Sep 08, 2021 | 2:22 PM

पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपुरात कडक निर्बंध लावण्याचे संकेत दिल्यानंतर व्यापारी संघटना संतप्त झाल्या आहेत. शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात असताना आत्मघातकी निर्णय घेऊ नका, अशी मागणी करत वेळ येईल तेव्हा आम्ही जरुर सहकार्य करु, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.

पालकमंत्र्यांचा नागपूर लॉकडाऊनचा इशारा, व्यापारी संतापले, म्हणाले, जरा थांबा, आत्मघातकी निर्णय घेऊ नका
नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत आणि नागपूर शहरातील व्यापारी
Follow us on

नागपूरनागपुरात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने शासन प्रशासनाने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने येत्या काही दिवसांत नागपुरात कठोर निर्बंध लादले जाऊू शकतात, अशी माहिती नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. मात्र पालकमंत्र्याच्या निर्णयावर शहरातील व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात असताना आत्मघातकी निर्णय घेऊ नका, अशी मागणी करत वेळ येईल तेव्हा आम्ही जरुर सहकार्य करु, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.

व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध

पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपुरात कडक निर्बंध लावण्याचे संकेत दिल्यानंतर व्यापारी संघटना संतप्त झाल्या आहेत. नागपूर विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सकडून प्रशासनाच्या भूमिकेला विरोध दर्शवत लगोलग लॉकडाऊनचा निर्णय घेऊ नका, अशी मागणी करण्यात आली आहे.

…तर व्यापारी परत कधी उभा राहणार नाही

परिस्थिती नियंत्रणात असताना लॉकडाऊनचा आत्मघातकी निर्णय प्रशासनाने घेऊ नये. दोन वर्षांनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असताना आणि दुकाने मागील महिन्यापासून सुरु झालेली असताना लॉकडाऊन सारखा निर्णय घेतल्यास व्यापारी पुन्हा उभा राहू शकणार नाही, असं आर्जव व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे केलं आहे.

परिस्थिती चिघळते आहे असं जाणवल्यास नक्की प्रशासनाला सहकार्य करु

सध्या नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकदेखील शासन आणि प्रशासनाला सहकार्य करत आहेत. थोडेफार आकडे वाढणारच आहे. पण मग अशावेळी थेट लॉकडाऊनचा निर्णय न घेता धोरणात्मक निर्णय घ्यावेत. परिस्थिती चिघळते आहे असं जाणवल्यास नक्की प्रशासनाला सहकार्य करु, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.

नागपुरात तिसऱ्या लाटेची चाहूल

नागपुरात येत्या तीन दिवसात लॉकडाऊनचे अधिक कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. हे निर्बंध लावताना रेस्टॉरंट, दुकानांच्या वेळा कमी करण्यात येणार आहे. तसेच विकेंडला संपूर्ण लॉकडाऊनही लावण्यात येणार असल्याचं सूतोवाच जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या एक आकडी संख्येत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही संख्या डबल अंकी झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

एकाचदिवशी 18 रुग्ण, लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांना कोरोना

राज्याची उपराजधानी नागपूरमधून चिंता वाढवणारी आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी असणाऱ्या नागपूरमध्ये रुग्णसंख्या दोन आकड्यांमध्ये पोहोचलीय. नागपूरमध्ये एकाच दिवशी 18 रुग्ण समोर आल्यानं तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जातेय. नागपूरमधून कोरोना रुग्ण वाढण्यास सुरुवात झाल्यानं ती तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

नागपूरमध्ये सर्वात कमी रुग्णांची नोंद होत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झालीय. मंगळवारी नागपुरात एकाच दिवशी 18 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे लसीकरण झालेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमातील 12 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील चिंता वाढली आहे.

पालकमंत्र्यांची भूमिका काय?

“आपण सारखं म्हणतो दुसरी लाट संपली आणि तिसरी लाट येणार…. आता तिसऱ्या लाटेने आपल्या जिल्ह्यात पाऊल टाकले आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी काही निर्बंध लावावे लागणार आहेत. हे निर्बंध येत्या दोन तीन दिवसात लावण्यात येतील. निर्बंध लावण्यापूर्वी लोकांशी चर्चा करण्यात येईल. चेंबर ऑफ कॉमर्सशी चर्चा करू. हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा करू आणि मीडियाशीही चर्चा करून सर्वांची मते जाणून घेऊन नंतर निर्णय घेऊ. मात्र, येत्या तीन दिवसात त्यावर निर्णय घेतला जाईल”, अशी भूमिका नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी मीडियासमोर मांडली.

(Nagpur traders Aggressive Over Nitin Raut Stand For nagpur Lockdown)

हे ही वाचा :

VIDEO: नागपुरात तीन दिवसानंतर लॉकडाऊन अटळ?, कसे असतील निर्बंध?; वाचा सविस्तर

VIDEO: नागपूर पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? नितीन राऊतांचं मोठं वक्तव्य, तिसऱ्या लाटेची भीती?