
सुनील ढगे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी | 31 डिसेंबर 2023 : ठाण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली या पार्टीत सहभागी झालेल्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अशात ठाण्यातील या रेव्ह पार्टीवरील कारवाईवरून विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. सर्रास रेव्ह पार्टी सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्हयात सर्वाधिक रेव्ह पार्ट्या होत आहेत, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे.
अमली पदार्थ ड्रगमुळे राज्य बुडत चाललं आहे. महाराष्ट्रात कायदा सुवस्था बिघडली आहे. गुटखा, तंबाखू विकला जात आहे. रेव्ह पार्टी खुलेआम सुरू आहे. त्याकडे सरकारचं लक्ष नाही. देवेंद्र फडणवीस यांची पकड मुख्यमंत्री असताना जी होती ती पकड उपमुख्यमंत्री झाल्यापासून सुटत चालली आहे, असं म्हणत वडेट्टीवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.
ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली गावाच्या जवळ रेव्ह पार्टी सुरु होती. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या नेतृत्वात क्राईम ब्रँच 5 च्या टीमने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसंच सर्व आरोपीना ताब्यात घेतलं आहे. या रेव्ह पार्टीतील 100 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यात 95 मुलं तर 5 मुलींचा ही समावेश असल्याची माहिती आहे. रेव्ह पार्टीत पकडलेल्या सर्व आरोपीचे मेडिकल चेकअप केलं जात आहे. चेकअपनंतर ठाणे कासारवडवली पोलीस ठाणे आणि क्राईम ब्रँच 5 च्या कार्यालयात नेण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील राजकारणांनी चुल्लू भर पाणीमध्ये डूब मरण्याची वेळ आहे. ती आता खरी होताना दिसून येत आहे. देश म्हणजे फक्त गुजरात नाही. एकेकाळी उद्योगात अग्रस्थानी असलेला महाराष्ट्र गुंतवणूक करणारे प्राधान्य देत होते. आता आपला प्राधान्यक्रम हा महाराष्ट्राचा आठव्या- नवव्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. उद्योग झपाट्याने पळवलं जात आहे. जोर जबरदस्तीने समृद्ध गुजरात करून देश खिळखिळा करण्याचं काम सुरू आहे. फॉक्सकॉन सारखे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील तरुणाचा हातात भिकेचे कटोरे देण्याचं काम सुरू आहे, असं म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय.