तीन वर्षांपूर्वी घराबाहेर गेलेल्या तरुणीची कुटुंबीयांशी भेट, पूजासोबत नेमकं काय घडलं?

| Updated on: Sep 14, 2022 | 4:39 PM

वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनी नागपूरच्या मानकापूर येथील आधार सेवा केंद्र गाठले. आधार सेवा केंद्राचे व्यवस्थापक अनिल मराठे यांनी बंगलोर येथील युआयडी मुख्यालयात संपर्क केला.

तीन वर्षांपूर्वी घराबाहेर गेलेल्या तरुणीची कुटुंबीयांशी भेट, पूजासोबत नेमकं काय घडलं?
Follow us on

नागपूर : ओडिशाच्या (Odisha) बालंगीर जिल्ह्यातून तीन वर्षांपूर्वी घराबाहेर पडलेल्या तरुणीची तब्बल तीन वर्षानंतर कुटुंबीयांशी भेट झाली. पूजा असं या 22 वर्षीय तरुणीचे नाव आहे. जुलै 2021 मध्ये पूजा ही नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस (Gittikhadan Police) स्टेशन हद्दीत पोलिसांना रस्त्यावर फिरताना दिसली. विचारल्यावर ती केवळ तिचे नाव ‘पूजा’ एवढेच बोलायची. पोलिसांनी तिला मुलींच्या शासकीय वसतिगृहात दाखल केले. वसतिगृहात अनेकांनी तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला. परंतु भाषेची अडचण आणि मानसिक स्थितीमुळे तिच्याकडून फारशी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. असं शासकीय मुलींच्या वसतीगृहाचे अधीक्षक अंजली निंबाळकर (Anjali Nimbalkar) यांनी सांगितलं.

मानकापुरातील आधार सेवा केंद्र गाठले

काही कालावधीनंतर पूजाचे आधार कार्ड तयार करण्याचा प्रयत्न वसतिगृहाकडून करण्यात आला. परंतु तिचे आधार कार्ड काही तांत्रिक कारणास्तव तयार होत नव्हते. त्यामुळे वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनी नागपूरच्या मानकापूर येथील आधार सेवा केंद्र गाठले. आधार सेवा केंद्राचे व्यवस्थापक अनिल मराठे यांनी बंगलोर येथील युआयडी मुख्यालयात संपर्क केला.

ओडिशाची असल्याचं आलं समोर

पूजाचे आधार कार्ड आधीच बनवल्याची माहिती समोर आली. आधार कार्डवरून तिचे पूर्ण नाव पूजा शांता आहे. ओडिशा राज्यातील बालंगीर जिल्ह्याच्या पटनागढ गावातील ती असल्याचे समोर आले. असं आधार सेवा केंद्राचे व्यवस्थापक अनिल मराठे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

तीन वर्षांपूर्वी झालं लग्न

पूजाचे आई-वडील मजूर असून तिला सात बहीण-भाऊ आहेत. तीन वर्षांपूर्वी तिच्या आईवडिलांनी पूजाचे लग्न राजस्थानमध्ये एका तरुणाशी लावून दिले होते. त्यावेळी तिची मानसिक स्थिती सामान्य होती.

आई-वडिलांशी झाली ओळख

परंतु लग्नाच्या दोन-तीन महिन्यांनंतर कुटुंबीयांशी तिचा संपर्क तुटला तो थेट आता नागपुरातच झाला. राजस्थानहून ती नागपुरात कशी पोहचली हेदेखील अजून एक कोडेच आहे. परंतु आई-वडिलांशी तिची झालेली भेट हा क्षण सर्वांना सुखावून गेला.