Nagpur TB campaign 6 ते 26 डिसेंबरदरम्यान क्षयरुग्ण शोध मोहीम, आशा सेविका देणार भेट

| Updated on: Dec 05, 2021 | 9:01 AM

6 ते 26 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये शहरात ही विशेष मोहीम राबविली जाणार आहे. या काळात शहरातील अतिजोखमीच्या स्थळी, परिसरांमध्ये मनपाच्या आशा स्वयंसेविका भेट देतील.

Nagpur TB campaign 6 ते 26 डिसेंबरदरम्यान क्षयरुग्ण शोध मोहीम, आशा सेविका देणार भेट
Follow us on

नागपूर : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे नागपूर शहरामध्ये क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार 6 ते 26 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये शहरात ही विशेष मोहीम राबविली जाणार आहे. या काळात शहरातील अतिजोखमीच्या स्थळी, परिसरांमध्ये मनपाच्या आशा स्वयंसेविका भेट देतील. नागरिकांना क्षयरोगाची माहिती देऊन त्यांना मनपाद्वारे करण्यात आलेल्या व्यवस्थेची माहिती देतील.

कोरोनामुळे उद्भवलेल्या आपात्कालीन परिस्थितीमुळे शहरात क्षयरुग्णांचे निदान व रुग्णांना औषधोपचारावर आणण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत अत्यंत कमी झाले आहे. यासंदर्भात आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून रुग्णांच्या लवकर निदानासाठी विविध उपाययोजना सुचविले जात आहेत.

वंचित राहिल्यास गुंतागुंतीचा सामना

रोगशास्त्रीय अभ्यासानुसार क्षय आजाराचे रूग्ण निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास रुग्णाला या रोगापासून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा सामना करावाच लागतो. त्याचप्रमाणे त्याच्या सहवासातील इतर लोकांनासुध्दा या आजारांचा धोका संभवितो. त्यामुळे समाजातील सर्व क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांचे औषधोपचार सुरू करण्याच्या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

बाधितांना औषधोपचाराची माहिती देणार

या मोहिमे अंतर्गत मनपाच्या आशा स्वयंसेविका अतिजोखीमग्रस्त स्थळ, परिसर जसे – झोपडपट्टी, विटाभट्टी, भटक्या जमाती, कामासाठी स्थलांतरित तसेच खाणीमध्ये काम करणारे कामगार, बेघर आदी सामाजिक गट तसेच तुरुंग, वृध्दाश्रम, आश्रमशाळा व वसतिगृह, आदिवासी मुलांचे वसतिगृह, मनोरुग्णालय आदी ठिकाणी भेट देतील. आशा स्वयंसेविका आदी ठिकाणांसह घरोघरी भेट देऊन क्षयरोगाच्या लक्षणांची माहिती देत आजाराने बाधित असलेल्यांना औषधोपचाराबाबत सविस्तर माहिती देतील.

सहकार्य करण्याचे आवाहन

नागरिकांनीसुद्धा मनपा प्रशासनाला सहकार्य करीत आपल्याकडे येणाऱ्या आशा स्वयंसेविकांना योग्य व अचूक माहिती द्यावी. आपल्या परिसरात कुणीही क्षयरोगाने बाधित असल्यास त्यांना मनपाच्या मोहिमेची माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहीरवार, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अंजूम बेग यांनी केले आहे.

MLC Election : पॉलिटिकल टुरिझमविरोधात काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांची तक्रार; दगाफटक्याच्या भीतीनं भाजप नगरसेवक सहलीवर

Nagpur पूर्व विदर्भात पारंपरिक धानाची समृद्धता, कृषी विभाग ठरविणार धोरण – सुधांशू पांडे