विशेष पॅकेजमधून जिल्ह्याचं नाव वगळलं, सत्तधारी पक्षातील आमदार आक्रमक, थेट सरकारला इशारा

राज्य सरकारने घोषित केलेल्या विशेष पॅकेजमधून नांदेड जिल्हा वगळण्यात आला आहे. यावर शिवसेनेचे नांदेड दक्षिण मतदार संघाचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी प्रतिक्रिया दिली असून, चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

विशेष पॅकेजमधून जिल्ह्याचं नाव वगळलं, सत्तधारी पक्षातील आमदार आक्रमक, थेट सरकारला इशारा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2025 | 7:08 PM

राज्य सरकारने घोषित केलेल्या विशेष पॅकेजमधून नांदेड जिल्हा वगळण्यात आला आहे. यावर शिवसेनेचे नांदेड दक्षिण मतदार संघाचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी प्रतिक्रिया दिली असून, चांगलाच संताप व्यक्त केला आहे.  मी सत्ताधारी आमदार असलो तरी शेतकऱ्याचा आहे. शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी टोकाची भूमिका घ्यायला तयार आहे. असा थेट इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी ही चूक केली, त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

नेमकं काय म्हटलं बोंढारकर यांनी?   

शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, अनेक शेतकऱ्यांचे फोन आले. शेतकऱ्यांची जी भावना आहे ती अगदी बरोबर आहे, नांदेड जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.  शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.  नांदेडचे नाव जीआरमध्ये आलं नाही, ही नांदेड जिल्ह्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. जीआरमध्ये काही चूक झाली असेल, जर अधिकाऱ्यांनी काही चूक केली असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, यामुळे जिल्ह्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे, असं बोंढारकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे, शेतकऱ्याच्या रोषाला आम्हाला समोर जावं लागत आहे. मी सरकारमधला आमदार असतो तरी आधी मी शेतकरी आहे. शेतकऱ्यांसाठी कुठल्याही टोकाच्या भूमिकेत जायची माझी तयारी आहे.  शेतकरी जीआरची होळी करत आहे, कारण शेतकऱ्याचं पोट जळालं आहे. जीआरमध्ये नांदेड जिल्ह्याचा  समावेश व्हावा अशी आमची मागणी आहे, असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

राज्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे, अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर केलं आहे, मात्र विशेष पॅकेजमधून नांदेड वगळण्यात आल्यानं आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी संताप व्यक्त केला आहे, त्यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे.