
नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकाच कुटुंबातील तब्बल सहा जणांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. नगराध्यक्ष पदासह एकाच कुटुंबातील सहा उमेदवारांना तिकीट देण्याच्या या निर्णयावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. पक्षाच्या ठरवून दिलेल्या निकषांमध्ये हे उमेदवार बसत असल्याने त्यांना उमेदवारी मिळाली आहे. यामुळे पक्षातील कोणीही कार्यकर्ता यामुळे नाराज नाही, असे गजानन सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.
गजानन सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सहा उमेदवारांपैकी अनेक जण १९९५ पासून नगरसेवक राहिले आहेत. त्यांनी आपापल्या भागाचे सातत्याने प्रतिनिधित्व केले आहे. लोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी मला संधी मिळाली आहे. मी विकासाच्या मुद्द्यावर, मागे केलेले काम आणि पुढे करणारे काम जनतेसमोर ठेवत आहे. माझ्या कुटुंबातील ६ उमेदवार रिंगणात असले तरी यापूर्वी ते नगरसेवक होते. त्यांनी त्या त्या भागाचे नेतृत्व केले आहे. १९९५ पासून त्या त्या भागाचे नेतृत्व सूर्यवंशी घराण्याने केले आहे,” असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
यावेळी गजानन सूर्यवंशी यांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी भाजपच्या कठोर निकषांकडे लक्ष वेधले. पक्षाकडे कोणत्याही उमेदवाराची मागणी नव्हती. पण या ठिकाणाहून दुसऱ्या कोणाचा अर्जही आला नाही. त्यामुळे पक्षाने उमेदवारांसाठी जे निकष ठरवले होते, त्या निकषांमध्ये जे बसले त्यांनाच उमेदवारी दिली आहे, असे गजानन सूर्यवंशी यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संभाव्य आव्हानाबद्दल गजानन सूर्यवंशी यांनी विश्वास व्यक्त केला. लोहा शहरात भाजप नेहमीच मजबूत राहिली आहे आणि भविष्यातही राहील. लोहामध्ये भारतीय जनता पार्टी कालही मजबूत होती, आजही मजबूत आहे आणि उद्याही मजबूत राहणार आहे. आम्ही जे उमेदवार दिले आहेत, त्याला लोहा शहरातील जनता सातत्याने आशीर्वाद देत आहे,” असेही त्यांनी म्हटले.
गजानन सूर्यवंशी यांनी लोहा शहराच्या विकासाची रूपरेषा मांडली. यावेळी त्यांनी अंडरग्राउंड ड्रेनेजचा प्रश्न, पार्किंग, गार्डन, प्लेग्राउंड आणि अन्य अंतर्गत सुविधांसारखी अनेक कामे हाती घ्यायची आहेत. लोहा शहरातील जनता भारतीय जनता पार्टी सोबत आहे, कोण कोणाला ताकद लावतो, याच्याकडे मी कधी बघितलं नाही आणि बघणारही नाही, असे गजानन सूर्यवंशी म्हणाले. विकासाच्या मुद्द्यावर लोहा नगरपालिकेवर भाजपाची सत्ता येईल आणि ३ तारखेला (निकाल दिवशी) भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.