
Nanded Loha Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक म्हटल्यावर जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या राजकारणात मोठ्या घाडमोडी घडत असतात. सध्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून तर पक्षांतराचे पेव फुटले आहे. आपल्या पक्षात तिकीट मिळत नसल्याचे समजताच माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक सोईच्या पक्षात उड्या मारताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही गटांत पक्षांतराची एक लाट आली आहे. पक्षबदल करताना सध्याच्या पक्षाचा राजीनामा देऊन मित्रपक्षामध्ये सामील होण्याचीही काही उदाहरणे समोर आली आहेत. नांदेड जिल्ह्यात असाच एक पक्षप्रवेश झाला असून भाजपाला जबर धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील भाजपाचे लोहा तालुका मंडळ अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. शरद पवार यांनी लोह्याचे उपनगराध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. शरद पवार हे भाजपाचे नेते तथा खासदार अशोक चव्हाण यांचे विश्वासू सहकारी मानले जात होते. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना हा जबर धक्का मानला जात आहे.
सध्या लोहा नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीची घोषणा होताच स्थानिक पातळीवर भाजपा, राष्ट्रवादी तसेच इतर पक्षांकडून विजयासाठी गणितं आखली जात आहेत. त्यासाठी स्थानिक पातळीवर ताकद असलेल्या नेत्यांना पक्षात सामावून घेतले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार यांच्या पक्षाने शरद पवार यांचा पक्षप्रवेश करून घेतला आहे. तर दुसरीकडे उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या नेत्याने तसेच स्थानिक पातळीवरच्या राजकारणाचा अभ्यास असलेल्या व्यक्तीनेच ऐनवेळी उडी मारल्यामुळे येथे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. लोहा नगरपरिषद जिंकण्यासाठी आता भाजपाला शरद पवार यांच्या तोडीचा चेहरा शोधावा लागणार आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.