तलवार, खंजीर, कट्यार अन्…; महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई, पोलिसांनाही फुटला घाम
नांदेडच्या रामदास नगरमध्ये पोलिसांनी छापा टाकून ४,७९६ अवैध शस्त्रे जप्त केली आहेत. या प्रकरणी जसवंत सिंग सुखमनी याला अटक केली असून ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आता नांदेड शहरात गुन्हेगारीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला शस्त्रास्त्रांचा एक अवाढव्य साठा पोलिसांनी जप्त केला आहे. नांदेडच्या वझीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रामदास नगर भागात ही धाड टाकण्यात आली. यावेळी एकाच घरातून तब्बल ४ हजार ७९६ बेकायदेशीर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्यामध्ये सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून पोलिसांनी केलेल्या या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे मोठे संकट टळल्याचे बोललं जात आहे.
नेमकं काय घडलं?
नांदेड ग्रामीण पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रामदास नगरमधील एका घरामध्ये शस्त्रास्त्रांचे मोठे कोठार तयार करण्यात आले आहे. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते. पोलिसांनी नियोजनबद्धरीत्या संबंधित घरावर छापा टाकला. घराची झडती घेतली असता तिथे असलेल्या तलवारी आणि इतर शस्त्रांचा डोंगर पाहून स्वतः पोलीस अधिकारीही चक्रावून गेले.
जप्त केलेल्या शस्त्रांचा तपशील आणि किंमत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत जप्त केलेल्या साठ्यात ४,७९६ धारदार शस्त्रांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने विविध आकाराच्या धारदार तलवारी, गुन्हेगारी कृत्यांसाठी वापरले जाणारे घातक खंजीर, कट्यार, लोखंडी आणि लाकडी दांड्याच्या घातक कुऱ्हाडी हे सर्व जप्त केले आहे. या सर्व जप्त केलेल्या मालाची एकूण बाजारपेठ किंमत साधारण ४३ लाख ५ हजार रुपये इतकी आहे. ही कारवाई नांदेडच्या इतिहासातील अवैध शस्त्रांवरील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
आरोपीचे जाळे आणि उद्देश
या प्रकरणी पोलिसांनी ५० वर्षीय जसवंत सिंग प्रकाश सिंग सुखमनी याला जागीच अटक केली आहे. यावेळी प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने ही शस्त्रे विक्रीच्या उद्देशाने शहरात आणली होती. तो ही शस्त्रे जिल्ह्याच्या विविध भागात आणि गुन्हेगारी टोळ्यांना पुरवणार होता. यामागे मोठे आंतरराज्य रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
नांदेड जिल्ह्यात अवैध शस्त्र व्यापाराविरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली जाईल. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही.” सध्या पोलीस या संपूर्ण नेटवर्कचा आणि पुरवठादारांचा सखोल तपास करत आहेत, असे अविनाश कुमार यांनी सांगितले.
