
सध्या महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता सघ्या इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे. त्यातच आता अक्कलकुवा तालुक्यातील स्थानिक राजकारणात मोठे बदल होताना दिसत आहेत. कुकडखुंट येथील शिवसेना शिंदे गटाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि असंख्य कार्यकर्त्यांनी माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
डॉ. हिना गावित यांनी नुकतंच भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. यामुळे भाजपची ताकद वाढत असून अनेक कार्यकर्ते आता त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपशी जोडले जात आहेत. केवळ शिंदे गटच नव्हे, तर काँग्रेसचेही असंख्य कार्यकर्ते अक्कलकुवा येथे भाजपचे कमळ हाती घेत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला याचा मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. याचा मला आणि भाजपला मोठा लाभ होईल, असा विश्वास माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी व्यक्त केला आहे. येणाऱ्या काळात अनेक पक्षांचे कार्यकर्ते भाजपमध्ये येतील, असेही त्यांनी नमूद केले.
नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात आणखी एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की, नंदुरबार जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती होणार नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, भाजपची प्रमुख लढत शिवसेना शिंदे गटासोबतच होणार आहे. यामुळे नंदुरबार आणि अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेसोबत युती होणार नाही.
पण शहादा आणि तळोदा मतदारसंघातील युतीचा निर्णय मात्र स्थानिक आमदार राजेश पाडवी घेतील. डॉ. हिना गावित यांनी स्पष्ट केले की, “जिल्ह्यात निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला असून, आमच्या नेत्यांनी जिल्ह्याची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे नंदुरबार आणि अक्कलकुवामध्ये शिवसेनेशी प्रमुख लढत असल्याने युती होणार नाही.” त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा दरी पडल्याचे दिसून येत आहे.तसेच एकंदरीत, नंदुरबार जिल्ह्यातील राजकारण तापले असून भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे, तर दुसरीकडे युतीबद्दल अद्याप स्पष्टता पाहायला मिळत नाही.