Nashik | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी कधीपर्यंत कराल अर्ज; काय आहे पात्रता, विद्यार्थ्यांना कसा मिळेल लाभ?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, त्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे आणि भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधेसाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.

Nashik | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी कधीपर्यंत कराल अर्ज; काय आहे पात्रता, विद्यार्थ्यांना कसा मिळेल लाभ?
संग्रहित छायाचित्र.
| Updated on: Feb 03, 2022 | 7:10 AM

नाशिकः अनुसूचित जाती (Scheduled Castes) आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेंतर्गत मॅट्रीकोत्तर शिक्षण व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेण्यासाठी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. याकरिता पात्र विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक (Nashik) कार्यालयातून विनामूल्य अर्ज प्राप्त करून तपासणी सूचीतील कागदपत्रांप्रमाणे विहीत मुदतीत परिपूर्ण अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2016-2017 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, त्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे आणि भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधेसाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.

अशी मिळेल मदत…

नाशिक शहरासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये भोजन भत्ता 28 हजार रुपये, निवास भत्ता 15 हजार रुपये, निर्वाह भत्ता 8 हजार रुपये असे प्रति विद्यार्थी 51 हजार रुपये देण्यात येणार आहेत. याबरोबरच या रक्कमे व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी अतिरिक्त स्वरूपात देण्यात येणार आहे.

त्यांनाही मिळणार लाभ…

या योजनेंकरिता 2020-2021 व 2021-2022 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार 22 डिसेंबर 2021 रोजीच्या शासनाच्या परिपत्रकान्वये या कालावधीत शाळा, महाविद्यालये बंद होती. यादरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण घेतले आहे, त्यांना देखील स्वाधार योजनेचा लाभ मिळण्याकरिता या शैक्षणिक वर्षासाठी पात्र ठरविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी…

पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सादर करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नासर्डी पुला जवळ, नाशिक पुणे रोड येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 0253-2975800 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.

असे आहेत पात्रतेचे निकष

– विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा.
– 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर परीक्षेमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावेत.
– विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.
– विद्यार्थी स्थानिक नसावा व शासकीय वसतिगृहात प्रवेशित नसावा.
– विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक राष्ट्रीयकृत बँकेशी संलग्न केलेला असावा.
– 12 वी नंतर पदवी व पदव्युत्तर अशा मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा व अभ्यासक्रम 2 वर्षापेक्षा कमी नसावा.
– अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणमर्यादा 40 टक्के आवश्यक आहे.
– जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी म्हणजेच नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत 5 किलो मीटर परिसरातील महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा.
– अर्जासोबत भाडे तत्वावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी भाडेकरार व शेवटचा वर्ग पास झाल्याची गुणपत्रिका अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
– संपर्कासाठी विद्यार्थ्याने त्याचा चालू स्थितीतील संपर्क क्रमांक देणे बंधनकारक आहे.

इतर बातम्याः

Nashik | प्रारूप प्रभाग रचनेत धक्क्यावर धक्के, अनेक नगरसेवक गॅसवर; महापौरांनाही जोर का झटका धीरे से…

टेन्शन खल्लास, नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रातच काढून मिळेल मुलांचे आधार कार्ड; काय आहे योजना?

Nashik | ‘महाडीबीटी’ पोर्टल संथ, विद्यार्थी हैराण; शिष्यवृत्तीसाठी कधीपर्यंत करता येणार अर्ज?