भोंदू बाबा अशोक खरातचा खेळ खल्लास, ऑफिसचा 4 वेळा पंचनामा, तिथे सापडलं असं काही….; आज कोर्टात होणार मोठा फैसला

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातवर ११ गुन्हे दाखल असून, ९ महिलांच्या लैंगिक छळाचे आणि नरबळीचे धक्कादायक आरोप आहेत. आज SIT त्याला कोर्टात हजर करून अधिक कोठडीची मागणी करणार आहे.

भोंदू बाबा अशोक खरातचा खेळ खल्लास, ऑफिसचा 4 वेळा पंचनामा, तिथे सापडलं असं काही....; आज कोर्टात होणार मोठा फैसला
Ashok Kharat
| Updated on: Mar 29, 2026 | 7:32 AM

नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी दर दिवशी विविध खुलासे होताना दिसत आहे. आता भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने अत्यंत गंभीर वळण घेतले आहे. अशोक खरातची ५ दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे आज विशेष तपास पथक (SIT) त्याला पुन्हा दुपारी न्यायालयात हजर करणार आहे. तपासादरम्यान समोर आलेले धक्कादायक पुरावे आणि गुन्ह्याची व्याप्ती पाहता, पोलीस अशोक खरातची पुन्हा दोन दिवसांच्या कोठडीची मागणी करण्याची दाट शक्यता आहे.

तपासातील धक्कादायक खुलासे

अशोक खरातवर आतापर्यंत एकूण ११ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये ९ गुन्हे हे महिलांवरील अत्यंत क्रूर अशा लैंगिक अत्याचाराचे आहेत, तर २ गुन्हे भाविकांची आर्थिक फसवणूक केल्याचे आहेत. केवळ अत्याचारच नाही, तर या प्रकरणात नरबळी आणि जादूटोणा यांसारख्या अघोरी प्रथांचा वापर केल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. आज याप्रकरणी कोर्टात सरकारी पक्षाकडून विशेष युक्तिवाद होण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी भोंदू बाबा अशोक खरातचे कार्यालय सील केले होते. गेल्या तीन दिवसांत हे कार्यालय उघडून तब्बल चार वेळा पंचनामा करण्यात आला आहे. या झडतीमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू, जादूटोण्याचे साहित्य आणि पीडित महिलांशी संबंधित महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळत आहे. विशेष तपास पथकाने (SIT) गेल्या पाच दिवसांत अशोक खरातची कसून चौकशी केली आहे. या चौकशीत त्याने दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष जागेवर मिळालेले पुरावे यांची सांगड घालून पोलिसांनी भक्कम दोषारोपपत्र तयार करण्याची तयारी सुरू केली आहे.

भोंदू बाबा अशोक खरातप्रकरणी ज्याप्रमाणे तपास पुढे सरकत आहे, त्याप्रमाणे अनेक पीडित समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशोक खरातने आशीर्वादाच्या नावाखाली अनेक कुटुंबांची दिशाभूल केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अशोक खरातच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान आता भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. सध्या तपासाचा आवाका मोठा असल्याने आणि गुन्ह्यातील तांत्रिक पुरावे गोळा करण्यासाठी SIT आणखी २ दिवसांची पोलीस कोठडी मागणार आहे. यावेळी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह इतर कठोर कलमे लावण्यावर युक्तिवाद होऊ शकतो. तसेच खरातची वैद्यकीय तपासणी करून त्याचे अहवालही न्यायालयात सादर केले जाऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आज कोर्टात काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us