भाजपचे मोठे धक्कातंत्र, दिग्गज आमदाराची तडकाफडकी उचलबांगडी, राजकीय वर्तुळात खळबळ

नाशिक भाजपमध्ये मोठा राजकीय फेरबदल झाला असून आमदार राहुल ढिकले यांना हटवून आमदार देवयानी फरांदे यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे.

भाजपचे मोठे धक्कातंत्र, दिग्गज आमदाराची तडकाफडकी उचलबांगडी, राजकीय वर्तुळात खळबळ
bjp maharashtra
| Updated on: Dec 19, 2025 | 9:26 AM

सध्या आगामी महानगरपालिका निवडणुकाची रणधुमाळी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक भाजपमध्ये मोठी संघटनात्मक उलथापालथ झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी धक्कातंत्राचा अवलंब करत निवडणूक प्रमुखपदावरून आमदार ॲड. राहुल ढिकले यांना अवघ्या महिनाभरातच हटवले आहे. त्यांच्या जागी आता आमदार देवयानी फरांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नाशिक भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

राजकीय वर्तुळात आश्चर्य

नाशिक महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने सध्या कंबर कसली आहे. गेल्या रविवारपासून शहरातील विविध विभागांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहे. या मुलाखतीची प्रक्रिया अत्यंत गोपनीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरु होती. गुरुवारी देखील मुलाखतींचा हा सिलसिला सुरु होता. त्यातच प्रदेश कार्यालयाकडून निवडणूक प्रमुख बदलल्याचा आदेश धडकला. विशेष म्हणजे, आमदार राहुल ढिकले हे स्वतः मुलाखत प्रक्रियेत सक्रिय असतानाच त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आमदार राहुल ढिकले हे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांची गेल्याच महिन्यात निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करून पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला होता. मात्र, त्यानंतर शहरात सुरू झालेल्या इच्छुकांच्या मुलाखती आणि जागावाटपाच्या चर्चेवरून पक्षात दोन गट पडल्याची चर्चा होती. अचानक झालेल्या या बदलामुळे भाजपमधील जुने विरूद्ध नवे असा संघर्ष तर सुरू झाला नाही ना? अशी चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे.

निवडीवर आणि प्रचाराच्या रणनीतीवर परिणाम

नवनियुक्त निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे या नाशिक मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्याकडे असलेला दांडगा जनसंपर्क आणि संघटनात्मक बांधणीचा अनुभव लक्षात घेऊन प्रदेश नेतृत्वाने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर नेतृत्व बदलल्याने उमेदवारांच्या निवडीवर आणि प्रचाराच्या रणनीतीवर याचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच राहुल ढिकले यांची उचलबांगडी करण्यामागे नेमकी काय कारणे आहेत, याबाबत भाजपने अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.

मात्र, मुलाखती दरम्यान झालेली गटबाजी आणि स्थानिक नेत्यांमधील समन्वयाचा अभाव यामुळेच प्रदेशाध्यक्षांनी हे धक्कातंत्र वापरल्याचे मानले जात आहे. या निर्णयामुळे नाशिक भाजपमध्ये आता दोन स्पष्ट गट पडल्याचे चित्र दिसत आहे. याचा पडसाद आगामी काळात उमेदवारी वाटपात उमटण्याची शक्यता आहे.