माणिकराव कोकाटेंना अटक कधी? सस्पेन्स वाढला, लिलावती रुग्णालयात काय घडतंय?
१९९५ च्या गृहनिर्माण घोटाळा प्रकरणी दोषी ठरलेले माजी मंत्री माणिकराव कोकाटे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या अटकेचा सस्पेन्स वाढला असून, आज होणारी अँजिओग्राफी आणि हायकोर्टातील सुनावणी यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे. माणिकराव कोकाटे यांना १९९५ च्या गृहनिर्माण घोटाळा प्रकरणी नाशिक न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यामुळे सध्या कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे. मात्र, ऐन अटकेच्या वेळी प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचा निर्णय वैद्यकीय अहवालानंतरच घेतला जाणार आहे.
माणिकराव कोकाटेंना अटक कधी?
माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आज अटक होण्याची शक्यता होती, मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना तूर्त दिलासा मिळाला आहे. सध्या ते मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहे. डॉक्टरांनी त्यांना प्रवासासाठी किंवा अटकेसाठी अनफिट असल्याचे सांगितले आहे. नाशिक पोलिसांचे पथक कोकाटे यांना ताब्यात घेण्यासाठी गुरुवारी रात्री उशिरा वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात पोहोचले होते. मात्र, डॉक्टरांनी माणिकराव कोकाटे यांना सध्या अटकेसाठी अनफिट ठरवले आहे. त्यांच्या हृदयाशी संबंधित काही समस्या उद्भवल्याने अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आजची रात्र तरी कोकाटे यांची अटक टळल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांची आज सकाळी लीलावती रुग्णालयात अँजिओग्राफी केली जाणार आहे. या अँजिओग्राफीचा रिपोर्ट काय येतो, यावर कोकाटेंना डिस्चार्ज मिळणार की नाही हे ठरणार आहे. सध्या नाशिक पोलिसांचे पथक मुंबईतच मुक्कामी आहेत. जोपर्यंत हॉस्पिटल प्रशासन कोकाटे यांना प्रवासासाठी किंवा कोठडीसाठी फिट असल्याचे प्रमाणपत्र देत नाही, तोपर्यंत पोलीस त्यांना ताब्यात घेऊ शकत नाहीत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रपाळीचे इन्चार्ज डॉ. कुलदीप देवरे यांचा जबाब नोंदवून पुढील उपचारांचा संपूर्ण आराखडा लेखी स्वरूपात मागवला आहे.
याचिकेवर आज सुनावणी
तर दुसरीकडे नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटेंना शरण येण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायाधीश आर. एन. लद्धा यांच्या समोर कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होईल. जर हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली किंवा अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला, तर पोलिसांना रिकाम्या हाती परतावे लागेल. मात्र, कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यास, डिस्चार्ज मिळताच त्यांना अटक केली जाईल.
दरम्यान या कायदेशीर लढाईमुळे महायुती सरकारची प्रतिमा मलीन होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारला आहे. हा राजीनामा राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, त्यांच्याकडील महत्त्वाची खाती सध्या तात्पुरत्या स्वरूपात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवण्यात आली आहेत.
