4 दिवस, 200 व्यवहार अन् 52 कोटींची रोकड; भोंदू बाबा अशोक खरातचा तो प्लॅन फसला, नाहीतर…

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातने अटक टाळण्यासाठी ६५ बनावट बँक खात्यांमधून ३ महिन्यांत ५२ कोटी रुपये काढल्याचे उघड. विदेशात पळण्याचा प्लॅन पोलिसांनी उधळला.

4 दिवस, 200 व्यवहार अन् 52 कोटींची रोकड; भोंदू बाबा अशोक खरातचा तो प्लॅन फसला, नाहीतर...
ashok kharat
| Updated on: May 18, 2026 | 9:04 AM

नाशिक सिन्नरमधील मिरगाव येथील तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याला महिला अत्याचाराच्या गंभीर आरोपांवरून अटक करण्यात आली. या घटनेनंतर आता अशोक खरात प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रसिद्ध भोंदू बाबा अशोक खरात याने पोलिसांच्या कारवाईचा ससेमिरा पाठीमागे लागताच, अवघ्या ३ महिन्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या बेनामी बँक खात्यांमधून तब्बल ५२ कोटी रुपयांची रोकड फस्त केल्याचे उघडकीस आले आहे. अटक होण्यापूर्वी हा संपूर्ण काळा पैसा पांढरा (White Money) करून परदेशात पळून जाण्याचा खरातचा डाव होता, अशी माहिती आता समोर येत आहे.

गुन्हा दाखल होताच पैशांची पळवापळव

मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये वावी पोलीस ठाण्यात संशयित जासूद आणि परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची झळ आपल्यापर्यंत पोहोचणार आणि आपणही अडकणार याची कुणकुण भोंदू अशोक खरातला लागली होती. त्यामुळे त्याने स्वतःला वाचवण्यासाठी आणि पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी एक युक्ती शोधली. त्याने जानेवारी २०२६ ते मार्च २०२६ दरम्यान अटक होईपर्यंत विविध बँकांमधून मोठ्या प्रमाणावर रक्कम काढण्यास सुरुवात केली.

४ दिवसांत २०० व्यवहार

तपासात समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हा सर्व काळा पैसा सुरक्षित करण्यासाठी त्याने तब्बल ६५ बनावट बँक खाती उघडली होती. यानंतर पोलिसांच्या आणि प्राप्तीकर विभागाच्या नजरेतून सुटण्यासाठी खरात आणि त्याच्या साथीदारांनी अवघ्या ४ दिवसांत या खात्यांमधून २०० हून अधिक आर्थिक व्यवहार केले. या वेगवान व्यवहारांद्वारे त्यांनी ५२ कोटी रुपये बँकेतून काढून घेतले.

विदेशात पळण्याचा डाव

अशोक खरातला आपल्यावरील कायदेशीर कारवाईची पूर्ण कल्पना आली होती. त्यामुळेच अटक होण्यापूर्वी त्याने हा अवाढव्य काळा पैसा पांढरा करायचा आणि भारतातून थेट परदेशात पलायन करायचे, अशी संपूर्ण योजना त्याने आखली होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे त्याचे विदेशात पळण्याचे मनसुबे धुळीस मिळाले. या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारामुळे आता या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ED) किंवा प्राप्तीकर विभाग (Income Tax) देखील चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us