Raj Thackeray: राज ठाकरे दोन दिवस कल्याण-डोंबिवलीत मुक्कामी! मनसैनिकांशी संवाद साधणार, बैठकीत नेमकी काय चर्चा होणार?
Raj Thackeray Kalyan-Dombivli Visit: राज ठाकरे दोन दिवस कल्याण-डोंबिवलीत मुक्कामी आहेत. मनसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांशी थेट संवाद साधणार आहेत. संघटनात्मक बांधणीचा आढावा घेणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर येणार आहेत. येत्या 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी राज ठाकरे कल्याण-डोंबिवलीत मुक्कामी असणार आहे. या दौऱ्यात ते मनसेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांशी थेट संवाद साधणार आहेत. पक्षाची संघटनात्मक बांधणी, स्थानिक पातळीवरील प्रश्न आणि आगामी राजकीय नियोजनाचा आढावा या दौऱ्यात घेतला जाणार आहे. त्यामुळे मनसेच्या स्थानिक संघटनेच्या दृष्टीने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कल्याण-डोंबिवली परिसरात मनसेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांनी या दौऱ्याचे नियोजन केले आहे. दोन दिवसांत ते शहरातील प्रमुख पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. या बैठकांमधून पक्षाच्या सध्याच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्याबरोबरच कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जाणार आहे. स्थानिक पातळीवर पक्षाचे काम कशा पद्धतीने सुरू आहे, संघटनेसमोरील अडचणी कोणत्या आहेत आणि आगामी काळात कोणत्या मुद्द्यांवर भर द्यायला हवा, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच शनिवारी (28 नोव्हेंबर) सायंकाळी 4 वाजता डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर चौक येथील प्रगती कॉलेज हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मनसेचे स्थानिक पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित राहणार आहेत. डोंबिवली शहरातील पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे.
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (29 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजता कल्याणमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत कल्याण शहरातील संघटनात्मक परिस्थिती, स्थानिक प्रश्न आणि आगामी राजकीय रणनीती यावर चर्चा होणार आहे. दोन्ही दिवसांच्या बैठकांमधून पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी दिशा ठरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कल्याण-डोंबिवलीत मनसेची संघटना अधिक सक्षम करण्यासाठी राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा असल्याचे डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी सांगितले. राज ठाकरे स्वतः पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधणार असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये या दौऱ्याबाबत उत्सुकता आहे. आगामी काळातील पक्षाचे संघटनात्मक काम आणि राजकीय भूमिका याबाबत या बैठकांमध्ये काय दिशा दिली जाते, याकडे आता स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
