वैभवच्या डबल सेंच्युरीचा चहुमुलखी डंका, पण इंटरनॅशनलमध्ये गणती होणार नाही, नेमकं कारण काय?
vaibhav sooryavanshi 200 Record : वैभव सूर्यवंशीने 52 चेंडूंत द्विशतक झळकावत क्रिकेटविश्वात खळबळ उडवली. मात्र, त्याची ही ऐतिहासिक खेळी वनडे इंटरनॅशनलच्या विक्रमांमध्ये नोंदवली जाणार नाही. एवढी मोठी कामगिरी करूनही त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय वनडे विक्रमाची नोंद का होणार नाही? यामागे लिस्ट ए क्रिकेटचा महत्त्वाचा नियम आहे.

Vaibhav Sooryavanshi World Record : वैभव सूर्यवंशीने अवघ्या 52 बॉलमध्ये द्विशतक झळकावत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या या ऐतिहासिक खेळीमुळे भारतीय संघाला UAE विरुद्ध विजय मिळवण्यातही मदत झाली. मात्र, या विक्रमी खेळीबाबत एक महत्त्वाची गोष्ट अनेकांना माहीत नसेल. वैभवने केलेल्या या 200 रनची नोंद आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटच्या विक्रमांमध्ये होणार नाही. त्याने इतिहास घडवला असला तरी हा विक्रम अधिकृत वनडे इंटरनॅशनलच्या (ODI) रेकॉर्ड बुकमध्ये दिसणार नाही. यामागचे कारण काय, हे समजून घेण्यासाठी लिस्ट ए क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फरक जाणून घेणे गरजेचे आहे.
लिस्ट ए क्रिकेट म्हणजे काय?
सर्वप्रथम लिस्ट ए क्रिकेट म्हणजे काय, हे समजून घेऊया. वनडे क्रिकेटचे सामने दोन प्रकारच्या पातळ्यांवर खेळले जातात. एक म्हणजे आंतरराष्ट्रीय वनडे सामने आणि दुसरे म्हणजे देशांतर्गत किंवा ए टीमचे सामने. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या 50 षटकांच्या सामन्यांना वनडे इंटरनॅशनल म्हणजेच ODI म्हटले जाते.
लिस्ट ए क्रिकेटमध्ये मात्र ODI सामन्यांसह देशांतर्गत 50 षटकांचे सामने आणि ए टीमकडून खेळल्या जाणाऱ्या पात्र सामन्यांचाही समावेश होतो. उदाहरणार्थ, वैभव सूर्यवंशी आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये बिहारकडून खेळणार आहे, तर त्या सामन्यातील त्याच्या कामगिरीची नोंद लिस्ट ए क्रिकेटमध्ये होईल.
वैभवचा विक्रम ODI मध्ये का मोजला जाणार नाही?
वैभव सूर्यवंशी सध्या भारतीय वरिष्ठ संघाचा भाग नसून इंडिया ए संघाकडून खेळत आहे. राइझिंग स्टार्स आशिया कपमध्ये भारताने आपला ए संघ मैदानात उतरवला आहे. पाकिस्तानचाही ए संघ या स्पर्धेत सहभागी आहे. त्यामुळे या स्पर्धेतील सामन्यांना लिस्ट ए क्रिकेटचा दर्जा मिळतो, मात्र त्यांची गणना आंतरराष्ट्रीय ODI सामन्यांमध्ये होत नाही.
त्यामुळे वैभवचे 52 बॉलमध्ये केलेले द्विशतक लिस्ट ए क्रिकेटमधील विक्रम म्हणून नोंदवले जाईल. मात्र, त्याची नोंद ODI क्रिकेटच्या विक्रमांमध्ये होणार नाही. भविष्यात वैभवने भारतीय वरिष्ठ संघाकडून वनडे खेळताना द्विशतक झळकावले, तर त्याच्या त्या खेळीची नोंद आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात होईल.
