नवऱ्यासोबत शेतात गेली, पंख्यात केस अडकले अन् क्षणात…; नाशिक हादरलं

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात कांदा पिकावर औषध फवारणी करताना एक हृदयद्रावक घटना घडली. ट्रॅक्टरचलित ब्लोअर मशिनमध्ये केस अडकून २७ वर्षीय माधुरी सोनवणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे दोन चिमुकल्या मुलींनी आई गमावली.

नवऱ्यासोबत शेतात गेली, पंख्यात केस अडकले अन् क्षणात...; नाशिक हादरलं
nashik women death
| Updated on: Dec 08, 2025 | 8:33 AM

नाशिक जिल्ह्यातील एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येवला तालुक्यातील कातरणीजवळ रविवारी दुपारच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. कांदा पिकावर औषध फवारणी करत असताना ट्रॅक्टरचलित ब्लोअर मशिनमध्ये केस अडकून एका विवाहितेचा मृत्यू झाला. माधुरी दीपक सोनवणे (२७) असे या विवाहित महिलेचे नाव आहे. त्यांच्या निधनाने दोन चिमुकल्या मुलींनी आईचे छत्र गमावले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

माधुरी आणि दीपक सोनवणे हे अल्पभूधारक शेतकरी असून ते फक्त एक एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. बदलत्या हवामानामुळे कांद्याच्या पिकावर रोगराईचा धोका वाढल्याने ते दोघेही पिकाचे संरक्षण करण्यासाठी एकत्र शेतात काम करत होते. रविवारी दुपारच्या वेळेत, ट्रॅक्टरला जोडलेल्या शक्तिशाली ब्लोअर मशिनद्वारे कांदा पिकावर औषध फवारणी सुरू होती. ब्लोअर मशिन चालवण्यासाठी ट्रॅक्टरचा वेग वापरला जात असल्याने, ते यंत्र अत्यंत वेगाने फिरत होते. ही फवारणी सुरू असताना मशिनच्या टाकीतील औषध मिश्रण किंवा पाणी संपले. हे मिश्रण पुन्हा भरण्यासाठी माधुरी सोनवणे या चालणाऱ्या मशिनच्या अत्यंत जवळ गेल्या.

त्या काळजीपूर्वक हे काम करत असतानाच अचानक त्यांचे लांब सोडलेले केस ब्लोअर मशिनच्या फिरत्या पंख्याजवळील भागात अडकले. हे केस अडकल्यामुळे मशिनच्या प्रचंड वेगामुळे माधुरी सोनवणे यांना मशिनने एका क्षणात आत ओढून घेतले. या मशिनच्या आत असलेल्या तीव्र गती आणि धारदार भागांमुळे त्यांच्या डोक्याला क्षणात अतिशय गंभीर दुखापत झाली. यानंतर मोठा रक्तस्त्राव झाला. हा अपघात घडल्यानंतर उपस्थित लोकांनी आणि पती दीपक सोनवणे यांनी त्यांना तात्काळ जखमी अवस्थेत उचलून उपचारासाठी मनमाड येथील रुग्णालयात दाखल केले.

त्या प्रकृतीची चिंताजनक स्थिती लक्षात घेऊन त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी येवला ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु तिथे तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या येवला ग्रामीण रुग्णालयात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात कातरणी गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. येवला तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

सोनवणे कुटुंबावर मोठा आघात

माधुरी सोनवणे यांच्या निधनाने सोनवणे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात केवळ ३ वर्षांची मोठी मुलगी आणि दीड वर्षांची दुसरी लहान मुलगी आहेत. आपल्या लहान लेकींचे आणि पतीचे स्वप्न अर्धवट सोडून गेलेल्या माधुरी यांच्यामुळे कातरणी गावावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.