नाशिकचा पालकमंत्री कोण? छगन भुजबळ- गिरीश महाजनांमध्ये रस्सीखेच, कोण काय म्हणालं?

रायगडनंतर आता नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी नाशिकमधील सर्वाधिक आमदारांच्या संख्येचा आधार घेत पालकमंत्रिपद आपल्या पक्षाला मिळावे अशी मागणी केली आहे. तर, भाजपचे गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. या वादातून राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

नाशिकचा पालकमंत्री कोण? छगन भुजबळ- गिरीश महाजनांमध्ये रस्सीखेच, कोण काय म्हणालं?
Chhagan Bhujbal Girish Mahajan
| Updated on: Aug 17, 2025 | 2:24 PM

गेल्या काही दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन वाद सुरु आहे. यापाठोपाठ नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुनही वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चांना उधाण आले आहे. छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये सर्वाधिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने पालकमंत्रिपद आपल्याच पक्षाला मिळावे अशी जोरदार मागणी केली आहे. तर, दुसरीकडे गिरीश महाजन यांनी या मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असे म्हटले आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले?

छगन भुजबळ यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी आपली भूमिका स्पष्ट केली. “रायगडमध्ये आमची एकच जागा आहे. पण त्यासाठी आम्ही पालकमंत्रिपदाचा आग्रह धरतो. त्याप्रमाणे नाशिकचे सर्वाधिक ७ आमदार आहेत. त्यासाठी त्यांनीही पालकमंत्रिपदासाठी तितकाच आग्रह धरावा. पालकमंत्री कोण होणार हा प्रश्न नाही. पण जर एकाच पक्षाचे सात आमदार असतील, तर त्या पक्षाला पालकमंत्रिपद मिळालं पाहिजे, याबद्दल मी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याशी बोलेन”, असे छगन भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांच्या या मागणीवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. “मी पालकमंत्री होतोय असे मी कुठेही बोललेलो नाही. पालकमंत्री पदासंदर्भात आमचे नेते, वरिष्ठ आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील. मी कोणताही दावा करणार नाही आणि मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल,” असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

कुठेही या प्रकरणात रस्सीखेच नाही – गिरीश महाजन

“लोक मला पालकमंत्री बोलत होते. मी त्यांना बोललो पालकमंत्री अजून होणार आहे. पालकमंत्री म्हणून मी माझे बोर्डही लावलेले नाही. तसेच ज्यांनी हे बोर्ड लावले होते त्यांना काढायला लावले. झेंडावंदनाचा तात्पुरता मला अधिकार दिला आहे. झेंडावंदन केलं म्हणून पालकमंत्री झालो असं नाही. कुंभमेळा मंत्री मी आहे. बैठका घेतोय मात्र पालकमंत्री पदावरून आपसात काही अडचणी आहेत त्या सुटतील. रायगड, नाशिक या दोन ठिकाणच्या पालकमंत्री पदावरून वाद आहे. छगन भुजबळ यांनी पालकमंत्री पदासाठी मागणी केलीच पाहिजे. मी काल सर्वांना सांगितलं माझा पालकमंत्री म्हणून उल्लेख करू नका. माझी कुठेही या प्रकरणात रस्सीखेच नाही. मी कुठेही पोस्टर लावा, बॅनर लावा,रास्ता रोको करा टायर जाळा मी असे कुठे केलेले नाही”, असे गिरीश महाजन म्हणाले.

पालकमंत्री पदासंदर्भात आग्रही भूमिका नाही – गिरीश महाजन

“मी पक्षातला सर्वात सीनियर माणूस आहे मला कल्पना आहे. याबाबतीत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेऊन यावर तोडगा काढतील. तुम्ही मला मारामारी करायला लावणार का? छगन भुजबळ ज्येष्ठ आहेत मी 95 ला आलो ते 90 पासून राजकारणात आहेत. नाशिकच्या पालकमंत्री पदावर निर्णय व्हायला उशीर होतोय परंतु आता जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील. परंतु माझी पालकमंत्री पदासंदर्भात वैयक्तिक, रस्सीखेच आग्रही भूमिका नाही”, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.