Vidhan Parishad Election 2026 : नाशिकमध्ये विधान परिषदेची एक जागा, भाजप-शिवसेनेतून मिळून पाच दावेदार, कोणाला मिळणार संधी?
Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 16 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. नाशिकमध्ये एका जागेसाठी भाजप-शिवसेनेतून मिळून पाच दावेदार आहेत. महायुतीमधील दोन्ही पक्ष आमने-सामने येऊ शकतात.

विधान परिषदेवर 9 सदस्यांची निवड झाल्यानंतर आता विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 16 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. विधान परिषदेवर जे 9 सदस्य पाठवण्यात आले ते विधान सभेतून पाठवण्यात आले. आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवरील सदस्याची निवड केली जाणार आहे. नाशिकमध्ये विधान परिषदेच्या एकाजागेसाठी शिवसेना-भाजपमध्ये चुरस आहे. भाजपा पाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेत देखील दावेदार वाढले आहेत. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आणि महापालिका निवडणुकीत किंग मेकरच्या भूमिकेत असलेले निलेश बोरा भाजपकडून विधान परिषदेसाठी प्रबळ दावेदार आहेत, तर भाजपाचे गणेश गीते यांचे नाव देखील चर्चेत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे यांचे नाव आघाडीवर आहे. तर अजय बोरस्ते आणि भाऊ चौधरी यांच्या नावाची देखील चर्चा आहे. विधान परिषदेसाठी एकूण 623 मतदार आहेत. सर्वाधिक 190 मतदार भाजपकडे आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेची देखील 171 मतं आहे. सर्वाधिक मतदार असल्याने भाजपाचा या जागेवर दावा आहे. मात्र एकमत न झाल्यास भाजप-शिंदे सेना मैत्रीपूर्ण लढतीच्या तयारीत आहेत.
भाजपने मागच्यावेळी राष्ट्रवादीला साथ दिलेली
नाशिक विधान परिषदेच्या जागेवरुन भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत संघर्ष होऊ शकतो. “यापूर्वी ज्या जागांवर शिवसेनेचे आमदार निवडून आलेत, तिथे शिवसेना दावा करणार. नाशिकमध्ये आमचा आमदार निवडून आल्याने ही जागा शिवसेनेची आहे” असं शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. भाजपकडे जास्त मतं असल्याने ते या जागेवर दावा करत आहेत. 2018 च्या निवडणुकीत नाशिकमधून शिवसेनेचे नरेंद्र दराडे निवडून आले होते. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजी सहाणे यांचं आव्हान होतं. भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. त्यावेळी नरेंद्र दराडे यांनी 200 मतांनी बाजी मारली होती. त्यामुळे नाशिक विधान परिषदेच्या जागेवरुन महायुतीमध्येच चुरस आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेचं एकूण संख्याबळ किती?
महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील आमदारांची एकूण संख्या 78 आहे. यात 30 सदस्य विधानसभेतील आमदार निवडतात. 22 सदस्यांची निवड स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होते. 7 पदवीधर, 7 शिक्षक मतदारसंघातून निवड होते. 12 आमदार राज्यपाल नियुक्त करतात.