भाजप हा पक्ष वॉशिंग मशीन, पक्षात आलेल्या लोकांनी… भाजपच्या शहराध्यक्षाचे मोठे विधान

नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये नेत्यांचा प्रवेश सुरू आहे. सुधाकर बडगुजर यांनी ठाकरे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर जयश्री पाटीलही लवकरच प्रवेश करणार आहेत.

भाजप हा पक्ष वॉशिंग मशीन, पक्षात आलेल्या लोकांनी... भाजपच्या शहराध्यक्षाचे मोठे विधान
bjp news
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 18, 2025 | 11:30 AM

महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच सध्या भाजपमध्ये सध्या इनकमिंग सुरु आहे. ठाकरे गटाचे उपनेते असलेल्या सुधाकर बडगुजर यांनी काल भाजपात प्रवेश केला. यामुळे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली. सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती, त्यानंतर आता त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यानंतर आता काँग्रेस नेत्या जयश्री पाटील या आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी यावर एक विधान केले आहे. भारतीय जनता पक्ष हे वॉशिंग मशीन आहे, हे खरं आहे, असे सुनील केदार म्हणाले.

सुनील केदार यांनी नुकतंच टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी सुनील केदार यांनी भारतीय जनता पक्ष हे वॉशिंग मशीन असल्याचा विरोधकांचा दावा अप्रत्यक्षपणे मान्य केला आहे. “भाजप हे वॉशिंग मशीन आहे हे खरं आहे. आमच्या पक्षात आलेल्या नेत्यांनी आमचे नियम स्वीकारले पाहिजे. आपल्या पक्षात असताना ते चांगले आणि दुसऱ्या पक्षात गेले तर ते नालायक, असे आम्ही मानत नाही,”  असे सुनील केदार यांनी म्हटले.

सीमा हिरे यांची नाराजी आम्ही काढू

“वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. सीमा हिरे यांची नाराजी आम्ही काढू. त्यांची समजूत काढू. ज्या सुषमा अंधारे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कमरेखाली वर केले तेच आज उबाठाचे प्रवक्ते झाले आहेत”, असा टोला सुनील केदार यांनी लगावला.

“सुधाकर बडगुजर आज पक्षात आल्याने नक्कीच ताकद वाढेल. आपल्या पक्षात असताना ते चांगले आणि दुसऱ्या पक्षात गेले तर ते नालायक असं आम्ही मानत नाही. घाम आल्याने बबन घोलप यांनी तोंड पुसलं असेल तर त्यात बातमी सारखे काही नाही”, असे सांगत त्यांनी याबद्दल बोलण्यास टाळाटाळ केली.

सुधाकर बडगुजर काय म्हणाले?

सुधाकर बडगुजर हे नाशिकमधील एक प्रमुख राजकीय व्यक्तिमत्त्व असून, त्यांची ओळख शिवसेना नेते संजय राऊत यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी म्हणून होती. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात २००७ मध्ये झाली, जेव्हा ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला, आणि त्यानंतर २००८ मध्ये त्यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.

बडगुजर यांनी नाशिक महापालिकेत विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत. २००९ ते २०१२ या काळात ते महापालिकेचे सभागृहनेते होते, तर २०१२ ते २०१५ या काळात त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले. राजकीय कारकिर्दीत त्यांना काही धक्केही बसले. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यानंतर त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यावर काही गुन्हेगारी घटनांमध्येही आरोप झाले आहेत. नुकतेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा घडवून आणली आहे.