
नाशिक शहरातील काठे गल्ली सिग्नल परिसरात असलेल्या सातपीर दर्ग्याला नाशिक महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. नाशिक महापालिकेने सातपीर दर्ग्याला मोठी कारवाई करत अतिक्रमण हटवण्याची नोटीस बजावली आहे. यासाठी त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या नोटीसमध्ये दर्ग्याच्या व्यवस्थापनाला १५ दिवसांच्या आत स्वतःहून केलेले अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा, महापालिका स्वतः पोलिस बंदोबस्तात कारवाई करेल, असा स्पष्ट इशारा नोटिसीत देण्यात आला आहे.
नाशिक महापालिकेने नुकतंच सातपीर दर्ग्याला एक नोटीस दिली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी अनधिकृत बांधकामाबद्दल भाष्य करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, नाशिक महापालिका क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी ४ मार्च २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार हजरत सैय्यद सात पीर बाबा दर्गा जनरल वैद्य नगर, काठे गल्ली, नाशिक हा दर्गा ब वर्ग अनधिकृत धार्मिक स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. यानुसार हे अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याची कारवाई मनपामार्फत लवकरच सुरु करण्यात येणार असून तत्तपूर्वी संबंधितांनी सदरचे अनधिकृत धार्मिक स्थळ स्वत:हून सदरील नोटीस चिकटवल्यापासून १५ दिवसांच्या आत काढून घ्यावे, अन्यथा महापालिकेमार्फत १५ दिवसांनंतर कोणत्याही क्षणी, कोणीतीही पूर्व सूचना न देता सदरचे अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यात येईल, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेने दिलेल्या नोटीसमध्ये सातपीर दर्ग्यातील काही भाग हा अनधिकृत असल्याचे नमूद केले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने याच दर्ग्यावरील काही वादग्रस्त भाग पोलिस संरक्षणात हटवला होता. आता थेट संपूर्ण अनधिकृत भागावर संकेत मिळत असल्याने खळबळ उडाली आहे. या नोटिसीनंतर सातपीर दर्ग्याचे विश्वस्त काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी जेव्हा दर्ग्यावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई झाली होती, तेव्हा विश्वस्तांनी वक्फ बोर्डाकडे धाव घेतली होती.
त्यामुळे आता महापालिकेच्या या नोटिसीनंतर विश्वस्त पुन्हा वक्फ बोर्डाचे दरवाजे ठोठावणार की अन्य काही कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नाशिक महापालिकेची ही कारवाई येत्या काही दिवसांमध्ये काय वळण घेते, याकडे नाशिक शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.