हनुमान जयंतीचा सप्ताह, 70 हून अधिक गावकऱ्यांना विषबाधा, कुठं काय घडलं?

| Updated on: Apr 08, 2023 | 7:51 AM

गावाखेड्यात हनुमान जयंतीचा उत्साह असतांना अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महाप्रसादातून विषबाधा झाल्याची बाब समोर आली आहे. 70 हून अधिक रुग्ण उपचार घेत आहे.

हनुमान जयंतीचा सप्ताह, 70 हून अधिक गावकऱ्यांना विषबाधा, कुठं काय घडलं?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : खरंतर गावाखेड्यात सध्या ठिकठिकाणी यात्रा होत आहे. त्याच दरम्यान काही ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. याच दरम्यान मोठी गर्दी होत असते. वार्षिक यात्रा असल्याने संपूर्ण गावच एकत्र येऊन यात्रा साजरा करत असते. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठा उत्साह असतो. असाच काहीसा उत्साह नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी गावात अखंड हरिनाम सप्ताह असतो. अनेक गावकरी मोठ्या उत्साहात असतांना अखेरचा दिवस होता. जयंतीच्या दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन पार पडल्यावर महाप्रसादाचा कार्यक्रम होता. त्याच दरम्यान एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

महाप्रसाद म्हंटल्यावर संपूर्ण गाव त्यात सहभागी झालेले असते. संपूर्ण गावाचाच तो कार्यक्रम असल्याने संपूर्ण गावाने महाप्रसादाचा लाभ घेतला. गावकऱ्यांनी खरंतर हा संपूर्ण महाप्रसाद गावातच बनविला होता. त्यामुळे काहींनी तिथेच लाभ घेतला तर काहींनी घरी नेला.

महाप्रसाद म्हंटल्यावर सर्वांनी आवडीने खाल्ला. पण जसजशी वेळ वाढत गेली त्यानंतर दुपारी चार ते पाच नंतर अनेक नागरिकांना त्रास होऊ लागला. कुणाच्या पोटात दुखायला लागले तर कुणाला उलट्या जुलाब सुरू झाले होते. त्यामुळे विषबाधा तर नाही झाली? असा संशय आल्याने नागरिक भयभीत झाले होते.

हे सुद्धा वाचा

नागरिकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण होऊ लागल्याने एकमेकांना विचारणा करू लागले. एकमेकांच्या त्रासाबद्दल सांगू लागले त्यानंतर नागरिकांनी लागलीच आरोग्य केंद्र गाठले. मात्र, सुट्टीचा दिवस असल्याने आरोग्य अधिकारी सुट्टीवर होते.

त्यानंतर लागलीच आरोग्य अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले. जिल्ह्यातील इतर आरोग्य अधिकारी यांनाही बोलावण्यात आले. त्यानंतर जिल्हा स्तरावर याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यांतरही विषबाधा झालेल्या नागरिकांची संख्या वाढत गेली.

सुरुवातीला पन्नास ते साठ जणांना विषबाधा झाल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर हळूहळू विषबाधा झालेल्या नागरिकांची संख्या वाढतच गेली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. त्यानंतर प्राथमिक उपचार सुरू झाल्याने अनेक नागरिकांना दिलासा मिळत होता.

स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही धाव घेत याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती दिली होती. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक यांनीही बाऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देत पाहणी केली. ज्यांची परिस्थिती खालावली आहे त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले आहे.

रुग्णांची संख्या वाढत असली तर त्यातून सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. किरकोळ त्रास होत असतांनाच ही निदर्शनास आल्याने लागलीच उपचार सुरू झाले असल्याने अनुचित प्रकार होता होता टळला आहे.