
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःला ज्योतिष आणि आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणारा भोंदू बाबा अशोक खरातची सर्वाधिक चर्चा सुरु आहे. अशोक खरातमुळे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील शिवनिका संस्थान सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे. या संस्थानाचा सर्वेसर्वा आणि स्वतःला कॅप्टन समजणारा म्हणवून घेणारा भोंदू अशोक खरात याच्या अटकेनंतर त्याने उभारलेल्या ईशान्यश्वर मंदिराची विविध धक्कादायक माहिती समोर येत आहेत. भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण उजेडात आल्यानंतर एकेकाळी भक्तांच्या गर्दीने गजबजलेले हे स्थान आता ओस पडल्याचे पाहायला मिळत आहे.
नाशिकच्या सिन्नर परिसरातून वाहणाऱ्या जाम नदीच्या ईशान्य दिशेला हे मंदिर बांधण्यात आले आहे. वास्तूशास्त्र आणि दिशांच्या मान्यतेनुसार ईशान्य दिशा ही ईश्वराची मानली जाते. याच भौगोलिक स्थानाचा आधार घेत अशोक खरातने या मंदिराला ईशान्यश्वर असे नाव दिले होते. या नावामुळे भक्तांमध्ये सुरुवातीला श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले. मात्र या नावाचा आधार घेत अशोक खरातने या ठिकाणी गैरप्रकार करण्यास सुरुवात केली.
अशोक खरातने मिरगाव परिसरात शिवनिका संस्थानाच्या माध्यमातून आपले मोठे साम्राज्य उभे केले होते. या साम्राज्याचा केंद्रबिंदू हे ईशान्यश्वर मंदिर होते. या मंदिराच्या संदर्भात अनेक धक्कादायक बाबी तपासात समोर आल्या आहेत. हे मंदिर पूर्णपणे कायदेशीर नाही. ईशान्यश्वर मंदिराचा काही भाग चक्क जाम नदीच्या पात्रात बांधण्यात आला आहे. नदी पात्राच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा आणून हे बांधकाम उभे राहिले आहे.
या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याखाली एक गुप्त विहीर असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या विहिरीचा वापर कशासाठी केला जात होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या नदी पात्रात शिवनिका संस्थानाचे विश्रामगृह उभारण्यात आले आहे. या विश्रामगृहाच्या बाजूलाच अशोक खरातची जवळपास १७ एकर मध्ये पसरलेली भव्य आंब्याची बाग आहे. या बागेच्या विकासासाठीही सरकारी यंत्रणेचा वापर केल्याचा संशय आहे.
अशोक खरातच्या ईशान्यश्वर मंदिरासाठी २०१८ मध्ये महायुती सरकारच्या काळात तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून तब्बल १.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने सभामंडप, पेव्हर ब्लॉक, भक्तनिवास आणि प्रसाधनगृहांचे काम पूर्ण केले होते. अशोक खरातच्या ईशान्यश्वर मंदिराची रचनाच संशयास्पद आहे.
या मंदिराच्या उजव्या बाजूला तीन मोठे अग्निकुंड आहेत. हे कुंड होम आणि विविध धार्मिक विधींसाठी वापरले जायचे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या येथे अर्धवट जळालेली नारळे आणि होमाचे साहित्य विखुरलेले आहे. या कुंडात खरात अघोरी पूजा आणि करणीसारखे प्रकार करत असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी जेथे हजारो भक्त रांगा लावत होते, तेथे आज शुकशुकाट पसरला आहे. अशोक खरातचे एकापाठोपाठ एक कारनामे बाहेर येत असल्याने आणि त्याच्यावर गुन्हे दाखल झाल्याने भाविकांनी या स्थानाकडे पाठ फिरवली आहे. एरवी गजबजलेल्या या मंदिर परिसरात आज फक्त पोलीस आणि तपासी यंत्रणाच दिसत आहेत. प्रशासनाने या मंदिर परिसराची आणि निधीच्या वापराची सखोल चौकशी सुरू केली आहे.