निदा खान TCS प्रकरणात मोठी अपडेट, इम्तियाज जलील यांना कोर्टाचा मोठा दिलासा
Imtiaz jaleel bail : निदा खानला आश्रय देण्यासाठी मदत केल्याचा आरोप असलेल्या एमआयएम नेते इम्तियाज जलील यांना नाशिक न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली.

नाशिक टीसीएस प्रकरणात एमआयएम नेते इम्तियाज जलील यांना 50 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजुर करण्यात आला आहे. निदा खानला मदत केल्याचा जलील यांच्यावर आरोप करण्यात आला होता. निदा पसार असताना लपण्यासाठी मदत केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला. मतीन पटेल यांनी जलील यांच्या सांगण्यावरून आश्रय दिल्याचा तपासात दावा करण्यात आला होता. नाशिक न्यायालयाच्या समन्सनंतर जलील आज हजर राहिले होते. यावेळी न्यायमूर्ती खारकर यांच्यासमोर जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. तिथे सुनावणीनंतर न्यायालयाकडून जलील यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर जलील यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले इम्तियाज जलील?
कोणत्याही आरोपीला कायदेशिर कारवाईसंदर्भात मदत करणं हा काही गुन्हा नाही होतं. बघा हे प्रकरण असं नाही की पोलिसांनी माझा त्यामध्ये काय रोल होता, हे शोधलं. ते त्यांनी त्यांच्या तपासामध्ये आणलं. खरंतर मी माझ्या सभेमध्ये सांगितलं होतं की, मी त्या प्रकरणाबद्दल जे जे अभ्यासलं. त्या मुलीला (निदा) भेटलो आणि जेव्हा तिने मला सांगितलं की सगळं प्रकरण काय होतं. तिचं म्हणणं होतं की तिचा काहीही रोल नव्हता. तर त्यावर मी काय म्हणलं होतं की, तू जर जे बोलतेय ते खरं असेल तर नक्की आम्ही तुमच्यासोबत उभे राहणार, आणि सोबत उभे राहणार म्हणजे, तुला वाचवण्यासाठी आम्ही काहीही करु शकत नाही, तुला वाचवण्यासाठी फक्त कायदेशिर सल्ला देऊ शकतो. कारण तिची कौटुंबिक पार्श्वभूमी तेवढी काही मजबुत नव्हती. त्यामुळे हा काही गुन्हा नाही होऊ शकतं, असं जलीलांनी यावेळी सांगितलं.
जर कायदेशिर गोष्टींमध्ये कोणाला काही सल्ला देणं जर गुन्हा असेल तर सर्व वकिलांना जेल व्हायला पाहिजे, असंही यावेळी जलीलांनी सांगितलं. तिला न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, नाशिकमधील कथित धर्मांतर आणि छळ प्रकरणातील मुख्य आरोपी निदा एजाज खान हिच्यावर कंपनी आणि पोलिसांनी पुढील कारवाया केल्या आहेत. त्यानंतर तिच्या नवऱ्यानंह तिच्याकडून घटस्फोट मागितला आहे. सध्या निदा ही गरोदर असून तिला न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.