Nashik Election : मविआची विधान परिषद निवडणुकीतून माघार? ठाकरे गटाची तातडीची पत्रकार परिषद, राजकारणात मोठा ट्विस्ट
आज विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्व पक्षीय उमेदवारांनी मोठी गर्दी केलीये, मात्र दुसरीकडे आता महाविकास आघाडीमधील मोठी बातमी समोर येत आहे.

राज्यात स्थानिक स्वारज्य संस्थेच्या 17 विधान परिषद जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 18 जून रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दरम्यान आज या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज सर्वच पक्षातील उमेदवारांनी गर्दी केल्याचं चित्र आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी अनेकजण इच्छूक होते. मात्र उमेदवारी न मिळाल्यानं महायुती आणि माहाविकास आघाडीमध्ये काही ठिकाणी बंडखोरी झाल्याचं देखील पहायला मिळत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर होताच, ज्यांना संधी मिळाली नाही असे सर्वच पक्षाती इच्छूक अस्वस्थ असल्याचं पहायला मिळत आहे.
दरम्यान नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे नाशिक विधान परिषद निवडणुकीमधून महाविकास आघाडी माघार घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक विधान परिषदेच्या जागेसाठी वसंत गिते आणि अनिल कदम हे इच्छूक होते. परंतु अद्यापही महाविकास आघाडीकडून कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही, त्यामुळे आता नाशिक विधान परिषद निवडणुकीतून महाविकास आघाडीने माघार घेतली आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. आज दुपारी तीन वाजता या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. समजा जर महाविकास आघाडीने या निवडणुकीतून माघार घेतली तर नगरसेवक कोणाला मतदान करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महायुतीच्याही अडचणी वाढल्या
दरम्यान दुसरीकडे ही जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला सुटल्यामुळे आता या ठिकाणी महायुतीच्या देखील अडचणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. गणेश गीते यांना नाशिकमध्ये भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी बंडखोरी केली आहे. गणेश गीते हे आज पुन्हा नव्याने फॉर्म भरणार आहेत. ते नवीन फॉर्म भरण्यासाठी निवडणूक कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत. गणेश गिते यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना शिंदे गटापुढे मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.