नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्ण हजाराच्या घरात; सिन्नर 159, निफाड 138 वर

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा अजूनही कमी व्हायला तयार नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज गुरुवारी प्राप्त अहवालानुसार सद्यस्थितीत 904 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्ण हजाराच्या घरात; सिन्नर 159, निफाड 138 वर
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 4:50 PM

नाशिकः नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा अजूनही कमी व्हायला तयार नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज गुरुवारी प्राप्त अहवालानुसार सद्यस्थितीत 904 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 642 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असून, जिल्ह्यातील 3 लाख 99 हजार 406 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

सध्या नाशिक ग्रामीण भागात नाशिकमध्ये 127, बागलाण 6, चांदवड 39, देवळा 9, दिंडोरी 42, इगतपुरी 5, कळवण 11, मालेगाव 6, नांदगाव 5, निफाड 138, सिन्नर 159, सुरगाणा 1, त्र्यंबकेश्वर 5, येवला 70 अशा एकूण 623 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 260, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 18 तर जिल्ह्याबाहेरील 6 रुग्ण असून अशा एकूण 904 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 8 हजार 952 रुग्ण आढळून आले आहेत.

नाशिककरांमागे चिंतेचा भुंगा

अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिककरांमागे चिंतेचा भुंगा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर आणि नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील तब्बल 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये 13 ऑक्टोबरपर्यत कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र, यामुळे नाशिकरांची चिंता वाढली आहे. कारण नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत 200 च्या जवळपास रुग्ण वाढत आहेत. सिन्नर तालुक्यातील नागरिकांचा नगरशी सातत्याने संबंध येतो. त्यामुळे येथील रुग्ण वाढत असल्याची शंका आहे.

नवरात्रोत्सवात नियम कडक

कोरोना काळात वणीच्या सप्तशृंगीगडावरील मंदिर 24 तास खुले राहणार आहे. मात्र, भाविकांना पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पास मिळवण्यासाठी कोरोनाचे दोन लसीचे डोस घेतल्याचा प्रमाणपत्र किंवा 72 तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे.

सद्यस्थितीत 904 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 642 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असून, जिल्ह्यातील 3 लाख 99 हजार 406 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
– डॉ. अनंत पवार, जिल्हा नोडल अधिकारी

इतर बातम्याः

Special report अशी आहे सप्तश्रृंगी देवीची कथाः गिरिजेचे रूप, द्रोणागिरीचा भाग; आठ फूट उंचीची, अठरा भुजांची माता!

नाशिकमध्ये 122 नगरसेवक गॅसवर; कुठला प्रभाग कुठे जोडणार, यावर राजकीय गणित ठरणार!

महापालिकेआधीच राजकीय धुळवड; नाशिकमध्ये 15 ऑक्टोबरपासून तब्बल 192 सहकारी संस्थांच्या निवडणुका