Nashik Municipal Election 2026: प्रचाराला फिरायचं नाही..; नाशिकमध्ये उमेदवारावर रोखली थेट बंदूक, वातावरण तापलं!

Nashik Municipal Election 2026: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सातपूर परिसरात प्रचार करणाऱ्या एका उमेदवारावर तरुणाने थेट बंदूक रोखत धमकी दिली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nashik Municipal Election 2026: प्रचाराला फिरायचं नाही..; नाशिकमध्ये उमेदवारावर रोखली थेट बंदूक, वातावरण तापलं!
कार्यकर्त्याने उमेदवारावर रोखली बंदूक
Image Credit source: Tv9
| Updated on: Jan 13, 2026 | 12:59 PM

Nashik Municipal Election 2026: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळतंय. अशातच नाशिकच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली आहे. नाशिकच्या सातपूर भागात आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर थेट बंदूक रोखण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर प्रचाराला न फिरण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे. याप्रकरणी ‘आप’ने गंभीर दावा केला आहे. समाधान यांच्यावर बंदूक रोखणारा आरोपी हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला आहे. प्रकाश लोंढे हे सध्या तुरुंगात असून तिथूनच ते निवडणूक लढवणार आहेत. या घटनेनंतर जमावाने बंदूक रोखणाऱ्या तरुणाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. हा संपूर्ण प्रकार आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोबाइलमध्ये कैद केला आहे.

‘आप’चे उमेदवार समाधान आहेर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रचारासाठी फिरत असताना एका तरुणाने अचानक त्यांच्यासमोर बंदूक काढली आणि ‘इथे प्रचाराला फिरायचं नाही’ अशी धमकी दिली. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. तेव्हाच आपच्या कार्यकर्त्यांनी आणि परिसरातील इतर नागरिकांनी संबंधित तरुणाला पकडून त्याला चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. या संपूर्ण घटनेमुळे सातपूर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

हे सर्व घडत असताना आपच्या कार्यकर्त्याने त्याच्या मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून सध्या तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संबंधित घटनेबद्दलची माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी तरुणाला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे. याप्रकरणी पुढे काय कारवाई होणार, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष आहे. ‘आप’ने तुरुंगात असलेल्या प्रशांत लोंढे यांच्यावर आरोप केल्यानंतर आता नाशिकमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

15 जानेवारी 2026 रोजी राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. अशातच अनेक ठिकाणी मतदारांना पैसे वाटण्याच्या, कार्यकर्त्यांना, उमेदवारांना धमकावल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.