
Malegaon Mayor: मालेगाव महानगरपालिकेत इस्लाम पार्टी हा सर्वात मोठा पक्ष असला तरी समीकरण फिरू शकतं. महापौर आणि उपमहापौर निवडीत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. MIM चे आमदार मौलाना मुक्ती मोहम्मद इस्माईल यांनी मंत्री दादा भुसे यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. जर राजकीय गणित जुळले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा महापौर आणि एमआयएमचा उपमहापौर निवडल्या जाऊ शकतो. या भेटीमुळे आता सत्ता समीकरण बदलल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. काय आहे ती पडद्यामागील मोठी घडामोड?
5 नगरसेवकांची जादूगिरी?
मालेगाव महानगरपालिकेत माजी आमदार आसिफ शेख यांच्या इस्लाम पार्टीचे 35 नगरसेवक आहेत. हा पक्ष सर्वात मोठा आहे. तर त्यापाठोपाठ एमआयएमचे 21 नगरसेवक, शिवसेना पक्षाचे 18, समाजवादी पार्टीचे 5, काँग्रेस पक्षाचे 3 आणि भाजपचे 2 नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेनेकडे 18 आणि एमआयएमचे 21 असे एकूण 39 नगरसेवक होतात. भाजपच्या दोघांनी पाठिंबा दिल्यास हा आकडा 41 च्या घरात पोहचतो. तर महापौर पदाच्या 43 हा जादूई आकडा गाठण्यासाठी या दोन्ही पक्षांना कमीत कमी 5 नगरसेवकांची गरज आहे. भाजपचे दोन आणि इतर तीन नगरसेवक आल्यास हा जादुई आकडा गाठल्या जाऊ शकतो.
शिवसेनेचा महापौर, एमआयएमचा उपमहापौर?
ताज्या अपडेटनुसार, इस्लाम पार्टीत पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत. त्यांनी जर बंडखोरी केली तर समीकरणं पालटू शकतात. एकूण 43 संख्याबळ गाठता येऊ शकते. त्यामुळे शिवसेनेचा महापौर आणि एमआयएमचा उपमहापौर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री दादा भुसे आणि एमआयएमचे आमदार मौलाना मुक्ती मोहम्मद इस्माईल यांच्या भेटीनंतर सत्ता समीकरणंही समोर येत आहे. आता या भेटीमध्ये नेमकं काय ठरलं आणि काय घडामोड घडते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे इस्लाम पार्टीचाच महापौर होईल असा विश्वास आणि दावा माजी आमदार आसिफ शेख यांनी केला आहे. मालेगाव महानगरपालिकेचा महापौर कोण होईल हे लवकरच समोर येईल. पण शिवसेनेचा महापौर झाल्यास मोठा ट्विस्ट येईल हे नक्की.