कुणबी आणि मराठा एकच, किती पुरावे ?; मनोज जरांगे यांचा आकडेवारीसह सर्वात मोठा दावा काय?

अंतरवाली सराटा येथे झालेल्या लाठी चार्ज प्रकरणी सरकार चौकशी संदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. फक्त अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून दिशाभूल करत आहे. मात्र 40 दिवसानंतर सरकारला ठोस भूमिका घ्यावीच लागणार आहे.

कुणबी आणि मराठा एकच, किती पुरावे ?; मनोज जरांगे यांचा आकडेवारीसह सर्वात मोठा दावा काय?
manoj jarange
| Updated on: Oct 08, 2023 | 10:46 AM

कुणाल जायकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, अहमदनगर | 8 ऑक्टोबर 2023 : मराठा समाजाला कुणबी असल्याचं सरसकट प्रमाणपत्र मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आधी उपोषण करून सरकारला धारेवर धरलं. सरकारकडून या संदर्भात कार्यवाही करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर जरांगे पाटील यांनी आता गावा गावात जाऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. रात्री एक वाजता असो की दोन वाजता कधीही जरांगे गावात गेल्यावर त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे. मनोज जरांगे पाटील येणार म्हणून अख्ख गाव रात्रभर जाग राहत आहे. जरांगे पाटील ज्या गावात जातात तिथे हे चित्र दिसत आहे.

काल मध्यरात्री 1 वाजता मनोज जरांगे पाटील हे नगरच्या एमआयडीसी परिसरात आले होते. यावेळी त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. त्यानंतर रात्री दीड वाजता या परिसरात सभा पार पडली.यावेळी जरांगे पाटील यांनी जनतेशी संवाद साधला. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचे पाच हजार पुरावे मिळाले असून त्यानुसार सरकारला आदेश पारित करावा लागणार आहे, असं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

तोपर्यंत माघार नाही

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात 40 दिवसाचा वेळ घेतला आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने तयारी करावी आणि त्यांना ती करावीच लागणार आहे. त्यासाठी हा वेळ दिला आहे. सरकारला 40 दिवस दिले आहेत. या चाळीस दिवसात त्यांनी आरक्षण द्यावे. नाही तर त्याशिवाय माघार घेणार नाही, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. सरकारने 40 दिवसाची मुदत घेतली आहे. त्यानंतर कालपासूनच मराठवाड्यात आरक्षण संदर्भात समितीच्या बैठका सुरू झाल्या आहेत. सरकार आमच्या मागण्यानुसार काम करत आहे, असंही ते म्हणाले.

तर काय होईल?

मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात सत्ताधारी दोन्ही समाजाची दिशाभूल करत आहे. गेल्या 25 ते 30 वर्षापासून ही दिशाभूल सुरू आहे. पण याद राखा दोन्ही समाज एकत्र झाले तर काय होईल? असा सूचक इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

ओबीसी नेत्यांकडून विरोध

सत्तेत असलेल्या ओबीसी नेत्यांकडून मराठा आरक्षणाला विरोध होत आहे. विरोध करायचा आणि घटनेच्या पदाचा सुद्धा गैरवापर करून त्या पदाचा अपमान करायचा हे त्यांना तरी कसं शक्य होतं? असा सवाल त्यांनी केला. जरांगे पाटील यांच्या टीकेचा संपूर्ण रोख अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या दिशेने होता.