आरक्षण नाकारलं तर भारत कधीही एक राष्ट्र बनू शकणार नाही : ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे

| Updated on: Jul 25, 2021 | 9:51 PM

भारत एक राष्ट्र निर्माण करण्याची पहिली प्रक्रिया ही आरक्षण आहे. ही प्रक्रिया नाकारली तर भारत कधीही एक राष्ट्र बनू शकणार नाही, असं मत ज्येष्ठ विचारवंत, लेखक रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केलं.

आरक्षण नाकारलं तर भारत कधीही एक राष्ट्र बनू शकणार नाही : ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे
Follow us on

नाशिक : “भारताचं एक राष्ट्र निर्माण करण्यासाठी आरक्षण निर्माण करण्यात आले. भारत एक राष्ट्र निर्माण करण्याची पहिली प्रक्रिया ही आरक्षण आहे. त्यामुळे आरक्षणाची गरज आहे. आरक्षण नावाची गोष्ट केवळ ओबीसी आणि अनुसूचित जाती जमाती यांच्या फायद्याची नाही, तर ही एक राष्ट्र बनविण्याची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया नाकारली तर भारत कधीही एक राष्ट्र बनू शकणार नाही,” असं मत ज्येष्ठ विचारवंत, लेखक रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केलं. ते नाशिकमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित एकदिवसीय शिबिरात बोलत होते. यावेळी कसबे यांनी ओबीसी जनगणना व समाज जागृती या विषयावर मार्गदर्शन केले.

रावसाहेब कसबे म्हणाले, “स्वातंत्र्य नंतरच्या काळात असे अराजक नव्हते असा आराजकत्व काळ आज बघायला मिळतो आहे. राष्ट्र सुरक्षित नाही, राज्य सुरक्षित नाही जात सुरक्षित नाही आणि माणूस सुरक्षित नाही. या अराजकचे सर्वात जास्त बळी या महिला ठरल्या आहेत. प्रत्येक माणसाच्या समोर प्रत्येक जातीच्या समोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. धर्म शास्त्रावर आधारित राष्ट्र उभे करण्याचे काम गेल्या 7 वर्षात झाले आहे. आज सर्वांपुढे स्वतःला सुरक्षित ठेवणे आणि जातीला सुरक्षित ठेवणे आवश्यक झाले आहे.”

“कुणावर अन्याय झाला असेल तर धावून जाणारं राष्ट्र”

“आरक्षणाने जात घट्ट होते हे अनेकांचे म्हणणे होते. हे महात्मा फुले यांनी खोडून काढले. राजर्षी शाहू महाराज यांनी राजकारभारात काम केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून मांडले. महात्मा फुले यांनी राष्ट्र ही संकल्पना मांडली. त्यानुसार राष्ट्र म्हणजे एकमेव देश एखाद्याच्या पायात काटा रुतला, तर दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे. कुणावर अन्याय झाला असेल तर त्याच्यासाठी धावून जाणे असे राष्ट्र अशी भूमिका त्यांनी मांडली. या देशाचे विसावं शतक हे सामाजिक अभिसरणाचे शतक आहे,” असं कसबे यांनी सांगितलं.

“छगन भुजबळ हे एक झुंजार नेते आहे. ते जोखीम पत्करणारे नेते आहे. त्यांनी महाराष्ट्रात ती जोखीम पत्करली आणि ते त्यातून तावून सुलाखून निघाले. मात्र देशपातळीवरील नेतृत्वाची जोखीम ते पत्कारू शकले नाही. ही माझी खंत आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

“लोक कल्याणकारी राज्य आज संपुष्टात आले”

रावसाहेब कसबे म्हणाले, “ज्या लोककल्याणकारी राज्यावर आरक्षण टिकून आहे. ते लोक कल्याणकारी राज्य आज संपुष्टात आले आहे. आता करायचे काय असा प्रश्न आता उभा राहिला आहे. आरक्षणा बरोबरच हे लोक कल्याणकारी राज्य टिकणे आवश्यक आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. कारण आरक्षण रद्द झाले, तर पुन्हा देश वर्णव्यवस्थेत अडकणार आहे. आरक्षण देण्याची गरज भासणार नाही अशी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. याची जबाबदारी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यावर दिली आहे. ही ऐतिहासिक जबाबदारी पार पाडावी.”

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक शहर कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यास संबंधित संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली परंतु गेल्या महिन्यात ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण माननीय उच्च न्यायालयाने स्थगित केली. हा ओबीसी समाजावरील सर्वात मोठा अन्याय आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी आणि येणाऱ्या धोक्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन व्हावे, ओबीसी समाजातील सर्व जातींनी एकसंघ राहून लढा निर्माण करण्यासाठी प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नाशिक येथे आयोजित केलेल्या ऑनलाईन एकदिवसीय प्रबोधन शिबिराचे उदघाटन ज्येष्ठ विचारवंत लेखक रावसाहेब कसबे, ज्येष्ठ विचारवंत लेखक उत्तम कांबळे, ज्येष्ठ विचारवंत लेखक प्रा. हरी नरके, माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, डॉ. कैलास कमोद, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा. दिवाकर गमे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, पुणे विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, नवनाथ वाघमारे, प्रा. नागेश गवळी, हर्षल खैरनार, पंढरीबाथ बनकर, अविनाश चौरे, विजय राऊत, प्रसाद सोनवणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

मराठा आरक्षणात 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्यासाठी अशोक चव्हाणांची मोर्चे बांधणी, सर्वपक्षीय खासदारांना पत्र

ओबीसींनी आपल्या हक्कासाठी पुढे येऊन लढा : छगन भुजबळ

राज्यांना केवळ आरक्षणाचा अधिकार देऊन फायदा नाही, 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करा; अशोक चव्हाणांची मागणी

व्हिडीओ पाहा :

Raosaheb Kasabe say if we reject reservation then India will not be a united nation