रामनवमीच्या दंगलीनंतर एसआयटी का नाही नेमली?; संजय राऊत यांचा भाजपला परखड सवाल

| Updated on: May 17, 2023 | 10:06 AM

संदलची परंपरा 100 वर्षांची आहे. मंदिराच्या दारावर देवाला धूप दाखवून पुढे जातात. देशात या परंपरा सर्वत्र आहेत. मोदींपासून आम्ही सगळे अजमेर शरीफला जातो. माहीम आणि हाजी अलीच्या दर्ग्यात जातो.

रामनवमीच्या दंगलीनंतर एसआयटी का नाही नेमली?; संजय राऊत यांचा भाजपला परखड सवाल
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाने आत घुसून काही मुस्लिम मंडळीने चादर चढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. रामनवमीच्या वेळी दंगल झाली होती. कधी नव्हे ती पहिल्यांदाच महाराष्ट्रात दंगल झाली होती. त्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली होती का? असा परखड सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

एसआयटी कसल्या नेमता? तुम्हाला माहीत नाही महाराष्ट्रात काय चाललं ते? राम नवमी संदर्भात एसआयटी नेमली का? राम नवमीला कधी नव्हे त्या दंगली झाल्या. गेल्या 60 वर्षात महाराष्ट्रात दंगल झाली नव्हती. त्यावर एसआयटी नेमली का नाही नेमली? अशा अनेक प्रकार आहेत. या सरकारच्या पायाखालची जमीन हादरली आहे. त्याचा हा परिणाम आहे. राज्यात सामाजिक सलोखा राखायला हवा. दंगली घडवून निवडणुका जिंकायचं असेल तर ते होणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

गदा तुमच्या डोक्यात बसली

कर्नाटकातही शेवटच्या चार दिवसात पंतप्रधानांनी बजरंग बलीची गदा फिरवली. ती गदा तुमच्याच डोक्यात बसली. हनुमान चालीसा करून वातावरण बिघडवता हे तुमचे धंदे आहेत. हा तुमचा व्यवसाय आहे. हिंदुत्व हा आमचा व्यवसाय नाही. हिंदुत्व ही आमची राजकीय रोजीरोटी नाही. हिंदुत्व ही आमची श्रद्धा, संस्कार आणि संस्कृती आहे. ज्यांचे ते नाही ते अशा दंगली घडवत आहेत, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.

संघाचे लोक हाजी अलीला जातात

कोणीही त्र्यंबक मंदिरात घुसल्याची माहिती नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून पत्र द्यायला लावलं. त्यांनीच त्र्यंबकेश्वरला बंद करायला सांगितलं आहे. संदलची परंपरा 100 वर्षांची आहे. मंदिराच्या दारावर देवाला धूप दाखवून पुढे जातात. देशात या परंपरा सर्वत्र आहेत. मोदींपासून आम्ही सगळे अजमेर शरीफला जातो. माहीम आणि हाजी अलीच्या दर्ग्यात जातो. त्यात संघाचे लोकही आहेत. मला माहीत आहे. पोलीसही चादर चढवतात. पण त्र्यंबकेश्वरच्या नावाने महाराष्ट्रातील वातावरण उद्ध्वस्त करायचं. नकली हिंदुत्वाच्या नावाने बोंबा मारायच्या हे प्रकार सुरू आहेत, अशी टीका त्यांनी केली.