मराठी बोलना जरूरी है क्या? अमराठी तरुणाचा व्हिडीओ व्हायरल; नवी मुंबईत नवा वाद?

खारघरमध्ये पुन्हा एकदा मराठी-अमराठी असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण इथे मनसेने एका अमराठी व्यक्तीला माफी मागायला लावली आहे.

मराठी बोलना जरूरी है क्या? अमराठी तरुणाचा व्हिडीओ व्हायरल; नवी मुंबईत नवा वाद?
navi mumbai non marathi video
| Updated on: Jul 28, 2025 | 8:00 PM

Kharghar Non Marathi Viral Video : गेल्या काही दिवसांपासून मुंबई तसेच उपनगरांत मराठी आणि अमराठी वाद पुन्हा पेटला आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता या वादाला वेळोवेळी चांगलीच फोडणी दिली जात आहे. मीरा भाईंदर, कल्याण येथील प्रकरणानंतर आता नवी मुंबईतील एक घटना समोर आली आहे. या व्हिडीओमुळे आता पुन्हा एकदा मराठी आणि हिंदीचा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

दुकानाची पाटी हिंदीत लावली

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना खारघर येथील आहे. येथे एक परप्रांतीय व्यक्ती येथे पिठाची गिरणी चालवते. मात्र या व्यक्तीने दुकानाची पाटी हिंदीत लावून ठेवलेली आहे. मागील अनेक दिवसांपासून मराठी व्यक्तींनी त्याला ती पाटी मराठी भाषेत लावण्यासंदर्भात वारंवार सूचना केल्या. मात्र त्याने पाटी न बदलता उलट मुजोरी करत उडवाउडवीची उत्तरं दिल्याचे बोलले जात आहे.

मनेसेने मागायला लावली माफी

त्यानंतर याच अमाराठी व्यक्तीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत संबंधित परप्रांतीय व्यक्ती मराठी बोलना जरूरी है क्या ? असे उत्तर देताना दिसत आहे. यामुळे आता एकच संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषा, मराठी भाषेतील पाट्या या मुद्द्यांना घेऊन मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. खारघरमधील या प्रकाराची मनसेने दखल घेत आक्रमक पवित्रा धारण केला. मनसेचे या परप्रांतीय व्यक्तीला माफी मागायला लावली आहे.

कल्याणमध्ये काय घडलं होतं?

काही दिवसांपूर्वी एका रुग्णालयात एका अमराठी तरुणाने रुग्णालयात काम करणाऱ्या एका अमराठी तरुणीला बेदम मारहाण केली होती. या घटनेचाही व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओनुसार तरुणीला अमराठी तरुण लाथा-बुक्क्यांनी मारताना दिसत होता. हा प्रकार समोर येताच मनसेने पीडित तरुणीची भेट घेत तिच्यावरील सर्व उपचार पक्षातर्फे करण्याची घोषणा केली होती. तसेच पोलिसांनी तरुणाला लवकरात लवकर पकडावे अन्यथा तो आमच्या हातात लागल्यास आम्ही आमच्या स्टाईलने पीडित तरुणीचा बदला घेऊ, असा इशारा मनसेने दिला होता.

मीरा भाईंदर येथे नेमकं काय घडलं होतं?

काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदर येथे एका अमराठी व्यापाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीतून बोल असे म्हणत मारहाण केली होती. त्यानंतर मीरा भाईंदर येथील अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसेच्या नेतृत्त्वात मीरा भाईंदरमध्येच मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेतेही सामील झाले होते.